सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे लोकसभेसाठी होणार आज ‘ मंथन’
सोलापूर : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडी मधून काँग्रेस पक्षाला मिळाला असल्याने काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दुसरीकडे महायुती मधून हा मतदार संघ भारतीय जनता पार्टीला असल्याने अद्यापही भाजपचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही.
काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघातील एक प्रचार दौरा पूर्ण केलेला आहे. सोलापुरात ही संकल्प मेळाव्याच्या माध्यमातून तीनही मतदार संघात वातावरण निर्मिती केली. या मेळाव्याला महाआघाडी मधील केवळ शरद पवारांच्या राष्ट्रवादी यांचे पदाधिकारी उपस्थित दिसून आले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी अध्यक्ष दिसले नाहीत.
दरम्यान रविवारी सोलापुरात सुशील रसिक सभागृहामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादीची मंथन बैठक आयोजित करण्यात आली आहे. शहराध्यक्ष सुधीर खराटमल यांनी माहिती दिली की, लोकसभा निवडणुकीसाठी आपण महाविकास आघाडीमध्ये आहोत. मित्रपक्ष म्हणून आपण आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याने या लोकसभा निवडणुकीत आपली भूमिका, प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने राबवायची यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून सूचना घेण्यात येणार आहेत.
आगामी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका तसेच विधानसभा निवडणुका आमच्या डोळ्यासमोर आहेत त्यासाठीही आमचे यंत्रणा आतापासूनच कामाला लागले आहे.