सीईओ मनिषा आव्हाळे यांचा आणखी एक दणका ; या अधिकाऱ्याची विभागीय चौकशी केली प्रस्तावित
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मनीषा आव्हाळे यांनी झेडपी तील आणखी एका अधिकाऱ्याला दणका दिला आहे. त्या अधिकाऱ्याची त्यांनी विभागीय चौकशी प्रस्तावित केल्याने जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली आहे.
सोमवारी पत्रकारांनी सीईओ आव्हाळे यांच्याशी संवाद साधला. जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातील आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्याची जी योजना आहे त्या योजनेतील अनेक लाभार्थ्यांना दोन वेळा लाभ देण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली होती. त्या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्या चौकशी समितीचा अहवाल सीईओ आव्हाळे यांना सादर करण्यात आला.
त्या अहवालात समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर हे अडचणीत आले असून त्यांच्या कामकाजाच्या वाढलेल्या तक्रारी पाहता मनिषा आव्हाळे यांनी खमीतकर यांची विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविला असल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्हा परिषद लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत आहे. 15 मार्च पर्यंतच्या दिलेल्या प्रशासकीय मान्यता, कामांचे कार्यारंभ आदेश, चालू असलेली कामे, निधी खर्चाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना सादर केली आहे. आमची संपूर्ण टीम निवडणुकीच्या कामात असून मी पुढील काळात जिल्ह्याची गुणवत्ता कशी वाढेल यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.