जुबेर बागवान यांची अजित पवारांच्या राष्ट्रवादीत घुसमट ; कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देणार?
सोलापूर : अजित पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असणारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांची अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच घुसमट होताना दिसत आहे, त्याला कारणेही तशीच आहेत. त्यामुळे बागवान हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
अजित पवार हे राष्ट्रवादीतून वेगळे झाल्यानंतर सोलापुरात शहराध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान हे दोन्ही नेते खंबीरपणे त्यांच्या पाठीशी त्यावेळी दिसून आले आणि महाराष्ट्रात सर्वात प्रथम या दोघांनीच आपला पाठिंबा अजित पवारांना जाहीर केल्याचे पाहायला मिळाले. जेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री झाले तेव्हा दादांना विरोध करणारे बरेच नेते या गटात आल्याचे दिसून आले.
त्यानंतर पदाच्या निवडी झाल्या यामध्ये संतोष पवार यांना अपेक्षाप्रमाणे शहराचे अध्यक्षपद मिळाले शहराध्यक्ष पदाला इच्छुक असलेले जुबेर बागवान यांच्याकडे कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर बागवान यांनी मुस्लिम समाजात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यास सुरुवात केली. जुबेर बागवान यांनी शहरात बागवान शहर जिल्हा जमीयत सोलापूर संघटना स्थापन करून त्या मार्फत आपले एक चांगले सामाजिक कार्य सुरू ठेवले.
दरम्यान आता पक्षामध्ये प्रचंड गटबाजी निर्माण झाली आहे. त्या गटबाजीचा फटका चांगल्या कार्यकर्त्यांना बसताना दिसतोय. अशा मध्ये आता निधी वाटपावरून श्रेयवाद ही रंगू लागला आहे. त्यातच आता शहरात आणखी कार्याध्यक्ष पद देणार असल्याची चर्चा सुरू असल्याने दादांच्या पाठीशी खंबीर असणाऱ्या अशा जुबेर बागवान यांच्यासारख्या कार्यकर्त्यांची घुसमत होत असल्याची चर्चा आहे.
एकीकडे अजित पवार हे भारतीय जनता पार्टी सोबत महायुती मध्ये असल्याने मुस्लिम समाज या पक्षाकडे आकर्षित होत नाही पण जुबेर बागवान यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळे समाज बऱ्यापैकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सक्रिय दिसून येतो.
मागील सहा वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षात काम करताना जुबेर बागवान यांनी चांगल्या पद्धतीने कार्य करताना दिसून आले आहेत असेच कार्यकर्ते जर पक्षातून जाऊ लागले तर पक्षाचे मोठे नुकसान होईल असे बोलले जाते.
एकूणच अजित पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये असलेली गटबाजी, त्यात अशा कार्यकर्त्यांची होत असलेली घुसमट आणि निधी वाटपावरून होत असलेला श्रेयवाद तसेच आहे त्या पदांची कारण नसताना होत असलेली निर्मिती त्याला कंटाळून जुबेर बागवान हे आता कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी पक्ष काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.