माजी महापौर महेश कोठे, प्रथमेश कोठे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल
सोलापूर – विकास कामांच्या श्रेयावरून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात श्रेयवादावरून झालेला वाद चांगलाच पेटला आहे. या हाणामारीप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी महापौर महेश कोठे यांच्यासह पाच जणांवर सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणीसोलापूर शहर भाजपचे कार्यकारिणी सदस्य सतीश कलप्पा भरमशेट्टी (रा. सरवदे नगर, जुना विडी घरकुल, मुळेगाव रोड, सोलापूर) यांनी फिर्याद दिली होती. त्या फिर्यादीवरून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश कोठे, प्रथमेश कोठे, शाबीर कुर्ले,जावळे सर,विठ्ठल कोटा यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात भा.दं.वि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४१, १४३, १४७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापूरच्या पूर्व भागातील विडी घरकुल येथील वैष्णव मारुती मंदिर ते राज इंग्लिश मीडियम स्कूलपर्यंतच्या डांबरी रस्त्याच्या उद्घाटनावरून कोठे आणि देशमुख समर्थक भाजपचे कार्यकर्ते सतीश भरमशेट्टी यांच्यात हाणामारी झाली होती. हाणामारीच्या घटनेनंतर आमदार देशमुख यांचे चिरंजीव किरण देशमुख आणि महेश कोठे व त्यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे यांच्यासह दोन्ही पक्षाच्या समर्थकांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्पराविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी ठाण मांडले होते.
भरमशेट्टी यांनी रस्त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला आमदार विजयकुमार देशमुख यांना निमंत्रित केले होते. या कार्यक्रमास देशमुख यांना का निमंत्रित केले म्हणून महेश कोठे, प्रथमेश कोठे, विठ्ठल कोटा, शाबीर कुर्ले आणि जावळे सर यांनी जमाव जमवून लोखंडी वस्तूंनी मारहाण केली. भांडण सोडविण्यास आलेल्या माझ्या पत्नीलाही लागले आहे, असे भरमशेट्टी यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानुसार या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणाची फिर्याद देण्यासाठी आम्ही गेलो होतो. मात्र, पोलिसांनी आमची फिर्याद घेतली नाही. पोलिसांवर राजकीय दबाव असल्याने आमची फिर्याद त्यांनी घेतली नाही, असा आरोप महेश कोठे यांनी केला. आमच्याच कार्यक्रमात येऊन भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि आमच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सध्या सत्तेचा गैरवापर सुरू आहे. पोलिसांनी आमची बाजू समजून घ्यावी आणि आमचीही फिर्याद घ्यावी, यासाठी आम्ही पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी भेटणार आहे, असेही महेश कोठे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर सांगितले. (साभार – fast news 24)