सोलापूर झेडपी प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार तृप्ती अंधारे यांच्याकडे?
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी पदी माध्यमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचाही पदभार अंधारे यांच्याकडेच आहे.
तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेला पूर्ण वेळ प्राथमिक शिक्षणाधिकारी मिळाला नाही. त्यानंतर काही महिने उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार पाहिला.
दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी पदी मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती झाल्यानंतर हा पदभार महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रसाद मिरकले यांच्याकडे सोपवण्यात आला होता. मागील काही महिन्यांपासून मिरकले यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या विभागात कामकाज केल्याचे पाहायला मिळाले. आता प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार मिरकले यांच्याकडून काढून तो माध्यमिकच्या प्रभारी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे देण्यात आल्याची खात्रीशीर जिल्हा परिषदेच्या सूत्रांकडून मिळाली.
माध्यमिक शिक्षणाधिकारी पदावर पुन्हा मारुती फडके हे येणार असल्याने प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार अंधारे यांच्याकडे देण्यात आल्याचे आता बोलले जात आहे. तृप्ती अंधारे या लकी ठरल्या आहेत. त्या सोलापुरात आल्यानंतर त्वरित त्यांना माध्यमिक चा पदभार देण्यात आला त्यानंतर परत काही दिवसांनी पुन्हा माध्यमिकचा पदभार मिळाला. आता लगेच प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार अशा क्रिमी पोस्ट त्यांना मिळाल्या आहेत.