ब्रेकिंग : सोलापुरात फिल्मी स्टाईल अँटी करप्शनची रेड ; सात हजाराची लाच घेणाऱ्या ग्रामसेवकासह शिपायाला अटक ; खाजगी इसम पळाला
सोलापूर : गावठाण प्रमाणपत्र देण्यासाठी दहा हजाराची मागणी करून तडजोड अंती सात हजाराची लाच घेणाऱ्या चिंचोलीकाटीच्या ग्रामसेवकासह ग्रामपंचायत शिपाई या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. यातील खाजगी इसम मात्र अँटी करप्शनच्या तावडीतून पळून गेल्याची माहिती मिळाली.
ग्रामसेवक संतोष नागनाथ वाघ वय 37, राहणार गवत्या मारुती चौक, मोहोळ व शिपाई परशुराम रवींद्र पाटोळे वय 35 राहणार चिंचोली काटी तालुका मोहोळ असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर सुधीर लांडगे हा खाजगी इसम पळून जाण्यात यशस्वी झाला.
तक्रारदार यांनी कर्ज प्रकरण साठी ग्रामपंचायत कडे गावठाण प्रमाणपत्र देण्यासाठी अर्ज केला होता, त्यासाठी ग्रामसेवकांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती, तडजोडी अंती सात हजार रुपये देण्याचे ठरले.
तक्रारदाराने याबाबत अँटी करप्शनकडे तक्रार केली होती. तक्रारदाराने लाचेची रक्कम सुधीर लांडे या खाजगी इसमा कडे दिली होती, लांडे याने ती रक्कम त्या दोघांच्या हातात दिली तिघांना संशय आल्याने ते दुचाकीवर सोलापूरच्या दिशेने निघाले, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत वडवळ फाट्या जवळ पकडले मात्र लांडे पळून जाण्यात यशस्वी झाला.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली हवालदार सोनवणे, घुगे, पवार, चालक गायकवाड यांनी केली.