सोलापूर : माजी आमदार आडम मास्तर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रे नगर इथल्या कामगार कष्टकऱ्यांच्या 15000 घरकुलांचे हस्तांतरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथे 19 जानेवारी रोजी होणार आहे. त्या दौऱ्याची नियोजन तयारी सुरू झालेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील रविवारी सोलापुरात आहे. सकाळच्या सुमारास आडम मास्तर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन नाश्ता केला. यावेळी पत्नी कामिनी आडम, कामगार वर्गासह मास्तरांनी पालकमंत्री पाटील यांचे स्वागत केले.
गाडीतून उतरताच पालकमंत्री चंद्रकांत दादांनी मास्तर यांचा पोशाख पाहून मास्तर तुमचा संपूर्ण पोशाख पांढरा शुभ्र आहे कुठेही डाग दिसत नाही. असे म्हणताच मास्तरांनी आजपर्यंत कुठलाही डाग लावून घेतला नाही साहेब असे उत्तर दिले.
त्यानंतर हे दोन्ही नेते मास्तरांच्या घराकडे येताना सहा महिन्यापूर्वी आडम यांनी बांधलेल्या इमारतीकडे पाहत त्यावरील कोयता हातोडा पाहून “तुम्ही कधीही कोयता थोडा सोडणार नाही असे म्हणताच मास्तरांनी सुद्धा “तुम्ही आरएसएस सोडणार नाही आणि मी कोयता हातोडा सोडणार नाही असे सांगितले. अशी पक्षाची निष्ठा आता कुठे पाहायला मिळत नाही असे म्हणून चंद्रकांत दादांनी अनेकांना चिमटे काढले.
मास्तरांच्या निवासस्थानी येताच त्यांच्या नातीला दादांनी चॉकलेट भेट दिले. यावेळी हातमागातून तयार केलेली साडी पालकमंत्र्यांना भेट देण्यात आली. वस्त्रोद्योग मधील विविध समस्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांचे ओएसडी बाळासाहेब यादव, मोहन डांगरे, नलिनी कलबुर्गी, युसुफ मेजर, व्यंकटेश कोंगारी, तौफिक शेख, नसीमा शेख, अनिल वासम, मुन्ना कलाबुर्गी, विल्यम ससाणे, वीरेंद्र पद्मा, सुनंदा बल्ला, शेवंता देशमुख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.