सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून युवक अध्यक्ष पदासाठी इच्छुक असणारे नजीब शेख आता पदावर संधी न मिळाल्याने पुन्हा काँग्रेस पक्षाच्या मार्गावर आहेत. त्यांनी एक कार्यक्रम घेऊन हे स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार व अजित पवार असे दोन गट पडल्यानंतर कार्यकर्ते ही विभागले गेले. त्यातच या दोन्ही गटातील नवे पदाधिकारी नियुक्त करण्यात आले. शरद पवार यांच्या गटाकडून सोलापूर शहर युवक अध्यक्ष पदासाठी व्यावसायिक नजीब शेख इच्छुक होते. त्यांच्यासोबतच सरफराज शेख व अक्षय वाकसे या युवकांनी सुद्धा युवक अध्यक्ष पदासाठी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली तसे आपापल्या पद्धतीने या सर्वांनी फिल्डिंग लावली होती.
नशीब शेख यांनी तौफिक शेख यांच्यामार्फत प्रयत्न केला. त्यादरम्यान झालेल्या शरद पवार यांच्या दौऱ्यावर शेख यांनी मोठा खर्च केल्याचे पाहायला मिळाले. शेवटी महेश कोठे यांच्या माध्यमातून प्रयत्न करणाऱ्या अक्षय वाकसे यांच्याच गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली तर सरफराज शेख यांना कार्याध्यक्ष करण्यात आले.
तेव्हापासून नजीब शेख हे नाराज होते. मागील काही दिवसात सोलापूर शहरात एक पोस्टर पाहायला मिळाले. त्यावर नुकताच मोहोळचे पैलवान सिकंदर शेख यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकली. त्यांचा सत्कार नजीब शेख यांनी ठेवला होता आणि त्या पोस्टरवर काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांचे फोटो दिसून आले. त्यामुळे नजीब शेख आता काँग्रेसच्या ‘नजदीक असल्याची चर्चा सुरू झाली आणि स्पष्ट झाले आहे. आमदार प्रणिती शिंदे या लोकसभा निवडणूक लढवणार असल्याने त्यांनीही आपली जोरदार तयारी सुरू केली आहे. येणाऱ्या प्रत्येकाचे काँग्रेस पक्षात स्वागत करण्यात येत आहे.