राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते तथा सोलापूर जिल्ह्याचे कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत नागरीकांचा जनता दरबार याचा शुभारंभ येत्या सोमवार 2 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात होणार आहे. नुकतच सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या उपक्रमाची जाहीर घोषणा केली होती, याची जोरदार तयारी सध्या उमेश पाटील सोलापूर जिल्ह्यामध्ये करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांना डिसेंबर मध्ये होत असलेल्या विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात विचारले तेव्हा त्यांनी मी विधान परिषदेला इच्छुक नाही, मात्र पक्षाने तिकीट दिल्यास निश्चित निवडणूक लढवेन असे सांगताना मी कोणताही अर्ज पक्षाकडे केला नाही, माझ्या माहितीप्रमाणे विधान परिषदेसाठी इतर कुणाचाही अर्ज आल्याचं अजूनही दिसलेलं नाही. विधान परिषदेसाठी सध्या माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्यासह माझेही नाव चर्चेत आहे. पक्षाने या सर्वांपैकी कोणालाही तिकीट दिले तर त्यांचे काम करून त्यांना निवडून आणणार आणि जर पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून विधानपरिषदेत उमेदवारी दिली तरी या सर्वांनी काम करून मला निवडून आणावेत अशी स्पष्ट भूमिका उमेश पाटील यांनी पत्रकारांसमोर व्यक्त केली.
उमेश पाटील हे सोलापूर जिल्ह्याचे कार्यकारी अध्यक्ष तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत. यापूर्वी त्यांनी पुणे पदवीधर विधान परिषदेसाठी तयारी केली होती. तशी इच्छा पक्षाकडे ही त्यांनी व्यक्त केली मात्र सोलापूर जिल्ह्यातील पक्षांतर्गत विरोध झाल्याने त्यांना उमेदवारी दिली गेली नाही मात्र त्यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची प्रशासकीय पातळीवरील कामे तसेच पक्ष वाढीसाठी आवश्यक ते प्रयत्न सुरू असून सध्या त्यांनी आपली गाडी सुसाट ठेवली आहे हे मात्र नक्की.




















