सोलापूर : नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शनिवारी जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतला. तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचे वडील हे शिवभक्त असल्याने त्यांनी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यांच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घेतले सिद्धरामेश्वराच्या चरणी लिन जिल्हाधिकारी कार्यालयात पाऊल ठेवले. ग्रामदैवताचे दर्शन घेऊन पदभार घेणारा बहुतेक हा पहिला अधिकारी असेल.
यावेळी पत्रकारांशी बोलताना कुमार यांनी सोलापूर जिल्ह्याच्या धार्मिक पर्यटनाला चालना देणार असल्याचे सांगितले. दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी मागील अनेक वर्षांपासून सोलापूरच्या मार्केटिंगवर भर दिला आहे. आपल्या सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी तसा प्रयत्न सुरू ठेवला आहे. विशेष करून सुभाष बापू यांचं सोलापूर शहर मुख्य सर्कल म्हणून सोलापूर शहरातील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, पंढरपूरचा पांडुरंग, तुळजापूरची आई तुळजाभवानी, गाणगापूरचे दत्त मंदिर अशा धार्मिक पर्यटनाचा सर्कल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यातच नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी धार्मिक पर्यटनाला चालना देण्याचा संकल्प केल्याने निश्चितच आमदार सुभाष देशमुख आणि जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्यात आता चांगलीच ट्यूनिंग जुळण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार घेताच मावळते जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी तब्बल दीड तास सोलापूर शहर जिल्ह्याच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. या चर्चेनंतर आपल्या अधिकाऱ्यांशी बोलताना कुमार आशीर्वाद यांनी कुंभारी येथे होत असलेल्या कामगारांच्या 30000 घरकुलांचा रे नगर प्रकल्पासह शासन आपल्या दारी, सुरज चेन्नई एक्सप्रेस, पंढरपूर आणि अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास या विषयांना प्राधान्य दिल्याची माहिती मिळाली.