सोलापूर : सोलापूर विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदी डॉक्टर इरेश स्वामी यांच्या रूपात पहिल्यांदाच लिंगायत समाजाला नियुक्ती करणारे सुशीलकुमार शिंदे हेच बोरामणी विमानतळ पूर्ण करू शकतात असा विश्वास जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांनी व्यक्त केला.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी या गावी आप्पासाहेब बिराजदार यांच्या वतीने आयोजित केलेले एका कार्यक्रमात जगद्गुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य हे बोलत होते. यावेळी कुंभारीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यासपीठावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, काँग्रेसचे दक्षिण तालुकाध्यक्ष हरीश पाटील, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य म्हणाले, सोलापूर शहर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने बोरामणी विमानतळ होणे अतिशय महत्त्वाचे आहे. या विमानतळामुळे सोलापूर सह लातूर, उस्मानाबाद, विजापूर, गुलबर्गा या जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळेल. हे विमानतळ होण्यासाठी सुशीलकुमार शिंदे यांनीच प्रयत्न केले आणि तेच हे विमानतळ पूर्ण करू शकतात. कारण, जेव्हा सोलापूर विद्यापीठ नव्याने स्थापन झाले. पहिला कुलगुरू होण्याचा मान हा लिंगायत समाजाला सुशीलकुमार शिंदे यांनी दिला हे कोणीही लिंगायत समाजाने विसरता कामा नये असेही डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य म्हणाले.
आमदार प्रणिती शिंदे यांचे काम मी कायम पाहत आलो आहे. सर्वसामान्य, कष्टकरी, कामगार यांच्यासाठी त्या कायम काम करत असतात, त्यांचे प्रश्न समस्यावर त्यांनी विधानसभेत आवाज उठवला आहे. त्यामुळे त्यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असून असे नेतृत्व भविष्यात लोकसभेत पाहायला मला आवडेल या शब्दात त्यांनी शिंदे पिता-पुत्री यांचा गौरव केला.