सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी आपला संपूर्ण फोकस सध्या शिक्षण विभागावर केला आहे. नुकताच त्यांनी सोलापूर शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी दिल्या. यामध्ये अनेक शाळेमध्ये वर्गखोल्या धोकादायक अवस्थेत दिसून आल्या. तसेच काही शाळेमध्ये शिक्षक संख्या जास्त आणि पटसंख्या कमी प्रमाणात होती.
जिल्हा परिषद दरवर्षी शिक्षण विभागासाठी वर्ग खोल्या दुरुस्ती आणि नव्याने बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करते परंतु या बांधकामाची क्वालिटी तपासली जात नाही. जिल्ह्यातील सुमारे 2700 जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनेक ठिकाणी वर्ग खोल्या धोकादायक अवस्थेत आहेत. त्याच्या दुरुस्तीवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. अशा धोकादायक शाळांचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढे जिल्हा परिषद शाळांच्या बांधकामांमध्ये कोणताही हलगर्जीपणा खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
अनेक शाळांमध्ये शिक्षक जास्त आणि विद्यार्थी संख्या कमी असं काहीस चित्र पाहायला मिळते. ज्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या कमी आणि शिक्षक संख्या जास्त त्या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक त्याच परिसरातील एक किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत वर्ग करून त्या शाळा चांगल्या पद्धतीने चालविण्याचा विचार प्रशासन करीत आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही राज्याचे शिक्षण आयुक्त यांच्याकडून सूचना आल्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल अशी माहिती आव्हाळे यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुमारे 500 हून अधिक शिक्षक पदे रिक्त आहेत. त्यासाठी बिंदू नामावली तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. येत्या आठ दिवसात बिंदू नामावली तयार होईल अशी माहिती त्यांनी दिली.