मोहोळ येथे दत्तनगर जिल्हा परिषद शाळा आहे. या ठिकाणी मराठी मुलांमुलींची शाळा, उर्दू शाळा, चार अंगणवाड्या आहेत. अनेक बालके, मुले, मुली शिक्षण घेत आहेत. मोहोळ शहरांमध्ये गेले चार दिवस झाले संततधार पाऊस पडत असल्याने दत्तनगर जिल्हा परिषद शाळेच्या आवाराला तळ्याचे स्वरूप आल्याने तेथील मुलांना तारेवरची कसरत करून त्यांच्या वर्गामध्ये जावे लागते. त्याचप्रमाणे साठलेल्या पाण्यामध्ये डेंगूचे डास होण्याची दाट शक्यता आहे.
या पाण्याने बालकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, तेव्हा तात्काळ त्या ठिकाणी मुरूम टाकून उपाययोजना तात्काळ कराव्यात अशी मागणी ठाकरे गट शिवसेना आघाडीच्या सीमा पाटील यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा सोमवार 31 जुलै 23 रोजी साठलेल्या पाण्याच्या ठिकाणी शाळेतल्या विद्यार्थ्यांसह आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.