सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सर्व विभागांचा आढावा सुरू केलेला आहे. त्यामुळे सर्व विभाग सध्या अलर्ट झाले आहेत. सोमवारी सीईओ आव्हाळे यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या महत्त्वाकांक्षी अशा जलजीवन मिशन योजनेच्या कामांचा तब्बल चार तास आढावा घेतला.
यानंतर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या सर्व कामांचा आज आढावा घेतला. ही अतिशय महत्त्वाची योजना असल्याने त्या कामांची मी स्वतः पाहणी करणार आहे, कामांची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे, या कामांना वापरण्यात आलेल्या साहित्य सुद्धा तपासण्यात येणार असून ग्रामस्थांकडून अभिप्राय घेतले जाणार आहेत. असे सांगताना तक्रार असलेल्या त्या 162 फायलींचे बील पेंडींग ठेवण्यात आले होते, ते तपासून लवकरात लवकर त्यावर ही तोडगा काढण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
जल जीवन मिशन अंतर्गत चालत असलेल्या कामाचे कामांमध्ये निकृष्ट दर्जाच्या पाईपच्या सर्वाधिक तक्रारी समोर आल्या. या पाहणी दौऱ्यात निश्चितच असे काही प्रकार समोर येण्याची शक्यता आहे. आव्हाळे यांच्या कामाचा धसका सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतल्याने आता चांगले काम होईल अशी अपेक्षा आहे.