उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट महिला आघाडीच्या माजी नगरसेविका सीमा पाटील यांच्या मागणीला यश आले असून मोहोळ शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर तातडीने मुरूम आणून टाकण्यात आला आहे.
मोहोळ शहरातील दत्तनगर येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. या ठिकाणी मराठी मुलांमुलींची शाळा, उर्दू शाळा, चार अंगणवाड्या आहेत. अनेक बालके, मुले, मुली शिक्षण घेत आहेत. मोहोळ शहरांमध्ये मागील काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे मैदानावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले होते. यामुळे विद्यार्थ्यांनाही शाळेत जाताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसून आले. तसेच या साचलेल्या पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती होऊन संभाव्य डेंगू आजाराच्या धोका ओळखून सीमा पाटील यांनी तातडीने मोहोळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना या ठिकाणी मुरूम टाकण्याची मागणी केली होती. अन्यथा त्यांनी याठिकाणी विद्यार्थ्यांसह आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला होता.
दरम्यान याबाबत माध्यमांमधून बातम्या छापून आल्या. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्यापर्यंत ही बातमी गेली होती.
या मागणीची पंचायत समिती प्रशासनाने तातडीने दखल घेतली असून सोमवारी याठिकाणी मुरूम आणून टाकण्यात आला आहे. यामुळे आता संभाव्य आजारांचा धोका टळला असल्याने पाटील यांनी दखल घेतल्याबद्दल पंचायत समिती प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.