सोलापूर : सोलापूर जिल्हा प्रशासन यंदा महसूल सप्ताह साजरा करीत आहे. संपूर्ण आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह तलाठ्यांपर्यंत सर्वच नागरिकांच्या दारोदारी जाणार आहेत. एक ऑगस्ट रोजी पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी बाळे येथे महसूल दिनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. नागरिकांना त्यांच्या हस्ते विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात दोन्ही पाय नसलेली एक दिव्यांग महिला खाटासह दाखल झाली.
याचवेळी कर्मचारी संघटनेचे शंतनू गायकवाड यांनी त्यांची विचारपूस करून निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्याशी समन्वय साधला. त्या दिव्यांग महिलेचे नाव आहे सुचित्रा वसंतराव गिराम.
पत्रकारांना जेव्हा ही माहिती मिळाली तेव्हा त्यांनी या दिव्यांग महिलेकडून माहिती घेतली त्या महिलेने सांगितले की, मी रत्नदीप हौसिंग सोसायटी येथील रहिवासी आहे. माझे वडील भारतीय सैन्यात होते, मी दिव्यांग आहे या सोसायटीमध्ये आमचे घर एका कोपऱ्यात असून या सोसायटीमध्ये झालेले अतिक्रमण आणि माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या प्रशालेने भिंत बांधल्याने जो नैसर्गिक सांडवा होता तो अडून पावसाच्या निचऱ्याचे पाणी थेट या आमच्या घरात घुसत आहे. हे अडचण मागील अनेक वर्षापासून आहे आम्ही या प्रकरणी वारंवार पाठपुरावा केला परंतु महानगरपालिकेने दुर्लक्ष केले, त्यामुळे नाईलाजाने मला जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन माझ्या मागणीकडे लक्ष वेधवे लागले असल्याचे सांगितले.
दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी पवार यांनी तातडीने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून या प्रकरणात लवकरात लवकर तोडगा काढावा आणि हा प्रश्न सोडवा अशा सूचना केल्याची माहिती मिळाली. माञ गृह शाखेचे नायब तहसीलदार बनसोडे यांनी त्या दिव्यांग महिलेला या परिसरात बसायचे नाही असे म्हणून कार्यालयातून हाकलून लावल्याचे समजते. याच बनसोडे यांच्या अनेक तक्रारी आहेत.