सोलापूर : कायमच वादग्रस्त असलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाला अखेर पूर्णवेळ शिक्षण अधिकारी मिळाला असून शासनाने लातूर शिक्षण विभागाचे सहसचिव मारुती फडके यांची नियुक्ती केली आहे. पूर्णवेळ अधिकारी मिळाल्याने माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रभारी अधिकाऱ्याचे ग्रहण अखेर संपले आहे.
तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांची सात फेब्रुवारी रोजी पुणे येथे बदली झाल्यानंतर तेव्हापासून माध्यमिक शिक्षणाधिकारी हे पद रिक्त होते त्यानंतर योजना शिक्षणाधिकारी सुलभा वटारे यांच्याकडे पदभार देण्यात आला. टप्पा अनुदान वेळी गोंधळ झाल्याने वटारे यांचा पदभार तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी काढून त्यांच्या जागेवर महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी जावेद शेख यांच्याकडे पदभार दिला होता.
अडीच महिन्यानंतर जावेद शेख यांचीही बदली लातूरला झाल्यानंतर नव्याने आलेल्या उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे स्वामी यांनी पदभार सोपविला. आता महिन्याभरातच शालेय शिक्षण विभागाने जिल्हा परिषद माध्यमिक विभागाला नवीन शिक्षणाधिकारी दिला आहे.
आमदार राम सातपुते यांनी अधिवेशनामध्ये सोलापूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार चव्हाट्यावर आणत चौकशी करण्याची मागणी केली होती त्यामुळे सध्या माध्यमिक विभाग चर्चेचा आणि ऐरणीवर आहे. अशाच आता नव्या शिक्षणाधिकारी मारुती फडके यांना सांभाळून काम करावे लागणार हे मात्र नक्की आहे.