राष्ट्रीय माता बाल संगोपन कार्यक्रमातर्गत व युनिसेफ या बाळांसाठी कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेतर्फे दरवर्षी 1 ते 7 ऑगस्टदरम्यान आरोग्य विभागामार्फत महिलांसाठी स्तनपान जनजागृती सप्ताह राबविण्यात येतो. यंदाही प्रत्येक जिल्ह्यात सर्व आरोग्य संस्थेत ‘स्तनपान जनजागृती सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हास्तरीय स्तनपान सप्ताहाचा शुभारंभ उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या हस्ते या सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित स्तनदा माता व गरोदर मातांसोबत आव्हाळे यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना सीईओ म्हणाल्या, बालकांच्या संगोपनाची जबाबदारी फक्त त्याला जन्म देणाऱ्या मातेचीच नाही तर संपूर्ण कुटुंबाची आहे. विशेष करून बाळाच्या पित्याने बालसंगोपनामध्ये बरोबरीचा वाटा उचलायला हवा. त्याचप्रमाणे मातेने सहा महिन्यांपर्यंत बाळास फक्त स्तनपानच करावे. बाळासह स्वतःच्या आरोग्याकडे महिलांनी लक्ष दिले पाहिजे. माता सुदृढ असेल तरच बालक सुदृढ राहील हे लक्षात घ्यावे. वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्या सल्ल्याने स्तनदा माता व गरोदर मातांनी आपली आरोग्य तपासणी व आहार याचे नियम पाळावेत असे आवाहन केले.
याप्रसंगी कोंडी गावच्या सरपंच सुमन राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे, गटविकास अधिकारी उत्तर सोलापूर महेश पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सागर मंगेडकर, बालविकास प्रकल्प अधिकारी सुर्यवंशी, वैद्यकीय अधिकारी डॉ सोनाली रनदिवे व डॉ. प्रितम मुंदडा यांच्यासह आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ अनिरुद्ध पिंपळे यांनी केले. तर आभार बालविकास प्रकल्प अधिकारी सुर्यवंशी यांनी मानले. याप्रसंगी सीईओ अव्हाळे यांच्या हस्ते गरोदर मातांचे गुलाब पुष्प व शेंगा लाडू देवून स्वागत करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात याप्रसंगी वृक्षारोपण करण्यात आले.