सोलापूर : व्हॉट्स ॲप, ईमेल अशा टेक्नॉलॉजीच्या जमान्यात सुद्धा भारताचे पोस्ट अजूनही टिकून असल्याचे समाधानकारक चित्र आहे. अशा धावत्या युगामध्ये आणि टेक्नॉलॉजीच्या जमान्यात पोस्ट ऑफिसने सुद्धा तसेच स्पीड पकडला पाहिजे असे अपेक्षित आहे परंतु काही कार्यालयात अजूनही त्याच जुन्या मशनरी असल्याने नागरिकांची प्रचंड तारांबळ होत असल्याचे समोर आले आहे.
सोलापूर शहरातील गुरुनानक चौक ते कुमठा नाका या रस्त्यावर असलेले जिल्हा न्यायालय पोस्ट कार्यालय मध्ये असाच एक प्रकार घडला. त्या ठिकाणी पोस्ट कार्यालयात आलेल्या काही नागरिकांना सुमारे दीड ते दोन तास ताटकळत बसावे लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्याला कारण ही तसेच होते.
या ठिकाणी असलेले प्रिंटर तिथल्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थित वापरता येत नव्हते तो वारंवार इतरांना विचारत होता. यावरून या पोस्ट ऑफिसमध्ये बहुतांश कर्मचारी नवीन भरती केलेले असावेत किंवा त्यांना अजून व्यवस्थित ट्रेनिंग दिलेली नसावी असे काहीसे चित्र यावेळी दिसून आले. सोलापुरातील काही नागरिकांना त्याचा त्रासदायक अनुभव आल्याचे पाहायला मिळाले आहे. यावरून संबंधित नागरिकांनी पोस्ट कार्यालयातील सेवा सुधारण्याची मागणी केली आहे.