परीक्षेपूर्वी लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. त्याच दिवशी मूल्यांकन चाचणी घेण्यात येईल व आवश्यकतेनुसार सर्वांना पुस्तके पुरविण्यात येणार आहे. त्यानंतर परीक्षेचा दिनांक जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षा स्थगित करण्यात आली नसून परीक्षेची तारीख नंतर कळविण्यात येणार असल्याचेही समजले.
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी लिपिकवर्गीय कर्मचाऱ्याची परीक्षा घेण्याचे ठरविले होते. त्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी सोमवारी जिल्हा परिषदेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून २० डिसेंबर २०२३ रोजी होणारी लिपिकवर्गायांची परीक्षा तूर्तास पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. दरम्यान, कर्मचाऱ्यांचे दोन टप्प्यांमध्ये प्रशिक्षण घेऊन त्याच दिवशी मूल्यांकन चाचणी घेण्याचे ठरले.
परीक्षेबाबतची तारीख नंतर कळविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा लिपिकवर्गीयांच्या परिषदेमधील परीक्षेसंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी ९ नोव्हेंबर रोजी परिपत्रक काढले आहे. या परीक्षेत टिपणी लेखन, पत्रलेखन, आदेश तयार करणे, दिलेल्या अवधीत संगणकावर टंकलेखन करणे, कार्यासन तसेच सेवाविषयक बाबीसंदर्भात ज्ञानतपासणी आदी बाबींचा समावेश असणार आहे. त्याचप्रमाणे कार्यासन तसेच सेवाविषयक संदर्भात ज्ञानतपासणी करण्यात येणार आहे. परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई होणार असल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, या बैठकीस कर्मचारी महासंघाचे दिनेश बनसोडे, राजेश देशपांडे, प्रमोद धावड, लिपिकवर्गीय संघटनेचे अविनाश गोडसे, कास्ट्राईब संघटनेचे अरुण क्षीरसागर, मागासवर्गीय बहु. कर्मचारी संघटनेचे गिरीश जाधव, आप्पाराव गायकवाड, संतोष जाधव, जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे राजपाल रणदिवे, दिव्यांग कर्मचारी संघटनेचे लक्ष्मण वंजारी आदी उपस्थित होते.