फारुख शाब्दी राजीनाम्यावर ठाम; जुबेर बागवान शाब्दिंना NCP त घेण्यात यशस्वी होणार? तो व्हिडिओ बराच सांगून गेला
सोलापूर : सोलापुरात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एमआयएम पक्षाला मोठा धक्का बसला असून शहराचे अध्यक्ष फारुख शाब्दी यांनी तडकाफडकी पक्षाचा आणि अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एमआयएम कार्यकर्ते आणि सोलापूरच्या राजकारणात खळबळ उडाली.
शाब्दि यांच्या मजरेवाडी येथील निवासस्थानी इच्छुक उमेदवार आणि समर्थक कार्यकर्ते यांची मोठी गर्दी झाली होती. शाब्दी यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते नारा देत होते. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी विनंती करण्यात आली. यादरम्यान शाब्दि यांनी माध्यमांशी सुद्धा अधिकृतपणे संवाद साधला नाही परंतु रात्री आठच्या सुमारास मात्र त्यांनी सर्व माध्यमांना बोलवून आपली भूमिका मांडली.
यावेळी त्यांनी आपण राजीनाम्यावर ठाम असल्याचे सांगितले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का? असे विचारले असता त्यांनी ते गुलदस्त्यात ठेवले आहे. दोन दिवसानंतर आपण निर्णय घेऊ असेही ते म्हणाले. फिरदोस पटेल यांच्या एम आय एम प्रवेशानंतर हे घडले का? असे प्रश्नावरही त्यांनी नकार दिला. आपण पक्षाला न्याय देऊ शकत नाही, त्यामुळे या पदावर राहण्याचे इच्छा नाही अशी भूमिका त्यांनी मांडली. पक्षातून बाहेर पडताना एमआयएम पक्षाला कोणतेही हानी पोहोचवणार नाही असे त्यांनी सांगितले. इच्छुक अनेक जण मला भेटले परंतु मी त्यांना पक्षाचे निरीक्षक सोलापुरात आहेत त्यांच्याकडे जाऊन भेटा अशाही सूचना केल्या असल्याचे सांगितले.
रविवारी एमआयएम पक्षाचे निरीक्षक अन्वर सादात हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांनी एमआयएम पक्षात प्रवेश केला. त्यावेळी हॉटेल लोटस मधून बाहेर येताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांची आणि शाब्दि यांची भेट झाली. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी गळाभेट घेतली तो व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
अन्वर सादात यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतरच शाब्दिक यांनी पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला नेमके त्या बैठकीमध्ये काय घडले हा सुद्धा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. राजकीय सूत्रांकडून अशी ही माहिती मिळते की फारूक शाब्दि हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार आहेत त्यांच्या सोलापुरात काही नेत्यांसोबत दोन-चार बैठका सुद्धा झाल्याचे समजते.
कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांची झालेली भेट ही बरेच काही सांगून जाते. त्यामुळे बागवान हे शाब्दिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यात यशस्वी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.




















