सोलापुरात भाजपला डावलून राष्ट्रवादी आणि शिवसेना युती ? या गुप्त चर्चेत काय घडले
सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणूक साठी सत्तेतील भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या एकत्रित युतीची शक्यता धूसर दिसत आहे.
यापूर्वी दोन वेळा शिवसेना एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात युती संदर्भात चर्चा झाली. पण भाजप शिवसेनेला आठ ते नऊ जागा देण्याचा प्रस्ताव देत आहे ते शिवसेनेला मान्य नाही. युतीसाठी भाजपने एकदाही पुढाकार घेतला नाही, या युतीच्या चर्चेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कधीही बोलावले गेले नाही त्यामुळे आता सोलापुरात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांच्या युती करण्या संदर्भातली बैठक माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मातोश्री निवासस्थान वर झाल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, निवडणूक प्रमुख सुधीर खरटमल यांच्यासह शिवसेनेचे माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, माजी शहरप्रमुख मनोज शेजवाळ, माजी जिल्हाप्रमुख मनीष काळजे, जिल्हाप्रमुख अमर पाटील, माजी नगरसेवक उमेश गायकवाड यांची उपस्थिती होती.
सायंकाळी सात वाजता सुरू झालेली बैठक मध्यरात्री एक पर्यंत चालल्याचे समजते. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस युती जवळजवळ निश्चित झाली असून या युतीमध्ये वंचित बहुजन आघाडीला घ्यायचे का अशी सुद्धा चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. कोण किती जागा लढवायच्या ते अद्याप माहिती मिळाली नाही. युतीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर अधिकृतरित्या सांगण्यात येईल अशी माहिती देण्यात आली.




















