सोलापूर : सोलापूर शहरातील भारतीय जनता पार्टीच्या दोन देशमुख आमदारांची पक्षांतर्गत धुसफूस कायम पाहायला मिळते. अनेक सार्वजनिक कार्यक्रमात त्याचा प्रत्यय सोलापूरकरांना आलेला आहे. सोलापूर शहरातील कार्यकर्ते सुद्धा बापू गट आणि मालक गटांमध्ये विभागले गेल्याचे चित्र आहे.
माजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आत्ताचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यात ही आमदार सुभाष देशमुख कायम सोबत दिसून आले परंतु विजयकुमार देशमुख हे लांब दिसून येतात.
दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येऊन गेले. पंढरपुरच्या कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी देवेंद्र फडणवीस यांचे पंढरपुरात आगमन झाले त्यावेळी त्यांच्या स्वागताला माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख हे आवर्जून उपस्थित होते. त्यांच्यासोबतच आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह इतर नेतेही उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख हे मात्र दिसले नाहीत. याचवेळी सुभाष देशमुख यांचे काही फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले.
सुभाष देशमुख हे पुणे येथे पंडित धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार यांच्या सत्संग कार्यक्रम ठिकाणी दिसून आले. त्या ठिकाणी सुभाष बापू यांनी बागेश्वर महाराजांचे दर्शन घेतले. त्यामुळे ते पंढरपुरात उपस्थित नव्हते परंतु अधिक माहिती घेतली असता समजले की सुभाष देशमुख यांनी पुण्यामध्येच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती मिळाली.