देवेंद्रचा पुढाकार ; फडणवीस यांचा लगेच होकार ! सोलापूरसाठी १०० कोटी रुपये तात्काळ देणार
सोलापूर : सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी अमृत २ योजनेकरिता ८०० कोटी रुपयांचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेने त्वरित पाठवावा. यातील हद्दवाढ भागातील पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी १०० कोटी रुपये तत्काळ वितरित करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सोलापूरच्या पाणीपुरवठाबाबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.


आमदार देवेंद्र कोठे यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती होती. सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठीच्या दुहेरी जलवाहिनीच्या कामाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. कोणत्याही परिस्थितीत ३१ मार्चपर्यंत दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण करण्याचे आदेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी सचिवांना दिले. पाकणी येथील जलशुद्धीकरणासाठीची जागा मनपाला देण्याबाबत वन सचिवांना सूचनादेखील दिल्या. दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी अतिरिक्त टाक्या, शहरांतर्गत नव्या जलवाहिनी तसेच इतर कामे अमृत २ योजनेतून करण्याकरिता सोलापूर महानगरपालिकेने त्वरित ८०० कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवावा. यातील शहराच्या हद्दवाढ भागातील पिण्याच्या टाक्या बांधण्यासाठी १०० कोटी रुपये सोलापूर महानगरपालिकेसाठी तत्काळ वितरित करण्यात येतील. तसेच उर्वरित निधीही देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी बैठकीत सांगितले.
देगाव येथे ३५० कोटी रुपये खर्चून बीओटी तत्त्वावर नागपूरच्या धर्तीवर मलनिस्सारण केंद्र बांधून तेथे टीटीपी प्लांट उभारून शुद्ध केलेले पाणी एनटीपीसीला द्यावे आणि एनटीपीसी सध्या वापरत असलेले ८० एमएलडी पाणी सोलापूरकरांना पिण्यासाठी वापरावे, अशी योजना प्रस्तावित आहे. या योजनेबाबत आम्ही आग्रही असून या योजनेच्या कृती आराखड्यासाठी आणि अंमलबजावणीसाठी तज्ञांना पाठवून पाहणी करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
या बैठकीस मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असीम गुप्ता, श्रीगोविंदराज, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, स्मार्ट सिटीचे अधिकारी गोपीचंद कदम, सार्वजनिक आरोग्य अभियंता वेंकटेश चौबे आदी उपस्थित होते.
—————-
सोलापूर महत्त्वाचे शहर, निधी कमी पडू देणार नाही
सोलापूर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर असून या शहराच्या विकासासाठी विशेषतः पाणीपुरवठ्यासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सोलापूर शहराच्या हद्दवाढ भागात अतिरिक्त टाक्या, जलवाहिनी आदी कामे करण्यासाठी आगामी काळात गतीने अंमलबजावणी होईल असेही मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी सांगितले.
————
शहराच्या पाणीपुरवठ्याला प्राधान्य
सोलापूर शहरवासीयांच्या मुबलक पाणीपुरवठ्याला आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सोलापूरच्या पाणीपुरवठा आणि एकूणच विकासाबाबत प्रचंड आग्रही असल्याने आगामी काळात शहर विकासाला मोठी गती मिळेल याची खात्री आहे.
— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य