अरे व्वा ! आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नांना यश ; सोलापूर सिव्हिलसाठी नवे एमआरआय मशीन मंजूर
सोलापूर: छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) येथे नव्या एमआरआय मशीनच्या मंजुरीचा मार्ग मोकळा झाला आहे. येथे सध्या कार्यान्वित असलेली मशीन साधारण बारा वर्षे जुनी असून कालबाह्य झालेली ही मशीन वारंवार दुरुस्त करून वापरण्याचा प्रयत्न होतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून येथील एमआरआय मशीन बंद असल्याने सोलापूर जिल्ह्यासह शेजारील कर्नाटक व तेलंगणातील हजारो रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. बाहेर खासगी रुग्णालयात महागडे एमआरआय स्कॅन करून आणण्याशिवाय रुग्णांना पर्याय नव्हता.
सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीत या प्रश्नावर ठोस भूमिका घेत सोलापूरच्या सिव्हिलसाठी नवे एमआरआय मशीन मंजूर करून घेतले. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीत आमदार कोठे यांनी सोलापूरच्या रुग्णांसाठी एमआरआय मशीनची तातडीची गरज असल्याचे स्पष्ट केले.
सोलापूरच्या सिव्हिलमध्ये नव्या तंत्रासह एमआरआय यंत्रणा उपलब्ध झाल्यास गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळणार असल्याची बाब अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनीही बैठकीत मांडली. आमदार कोठे व अधिष्ठाता यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागाच्या सचिवांना त्वरित निधी मंजूर करण्याचे आदेश दिले.
सदर बैठकीला ग्रामविकास मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शितल तेली-उगले यांच्यासह समितीचे अन्य सदस्य आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सोलापुरातील आरोग्य सुविधांसाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. नवीन एमआरआय मशीन लवकरच कार्यान्वित होणार असून, त्यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.