मोहोळचे उमेश पाटील भाजपच्या ‘ सावली’त ; जयकुमार गोरे यांच्या भेटीने चर्चेला उधान
सोलापूर : सध्या कोणत्याही पक्षात नसलेले मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळ असलेले मोहोळचे नेते उमेश पाटील यांची मागील काही दिवसांपासून वेट अँड वॉच भूमिका पाहायला मिळाली.
मोहोळ मतदार संघात आमदार यशवंत माने यांचा पराभव केल्यानंतर त्यांचे सोलापूरच्या राजकारणातील वजन वाढलं आहे. काही दिवसातच त्यांनी राजू खरे यांना आमदार करून दाखवले.
अजित पवार गटाच्या मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा दिल्यानंतर उमेश पाटील हे कोणत्याही पक्षात गेले नाहीत. अनेकांना वाटले की ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील परंतु त्यांनी त्यांचा आमदार निवडून आणला.
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा गुरुवारी सोलापूर जिल्हा दौरा झाला. या पहिल्याच दौऱ्यात गोरे हे मोहोळ शहरातील उमेश पाटील यांच्या सावली निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार समाधान आवताडे, माजी आमदार राम सातपुते, प्रदेश नेते संतोष पाटील ही नेते मंडळी उपस्थित होती.
उमेश पाटलांनी पालकमंत्री गोरे यांचे अतिशय भव्य दिव्य असे स्वागत केले. क्रेनने भला मोठा हार आणून त्यांचा सत्कार केला.
भाजपच्या पालकमंत्र्यांच्या भेटीनंतर उमेश पाटील भारतीय जनता पार्टी जाणार का? अशा चर्चेला आता मोहोळ तालुक्यासह जिल्ह्यात उधाण आले आहे. मोहोळचे उमेश पाटील भारतीय जनता पार्टीच्या सावलीत असेही आता बोलले जाऊ लागले आहे.
पंढरपूर- मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांच्याशी उमेश पाटील यांची जवळीक वाढल्याने येणाऱ्या काळात उमेश पाटील हे काय भूमिका घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.