अमर पाटील यांच्या प्रचारार्थ जिल्हा काँग्रेसचे कार्यकर्ते उतरणार मैदानात ; दोन-चार नेते म्हणजे काँग्रेस नव्हे !
सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात प्रथमच काँग्रेसच्या चिन्हाशिवाय विधानसभेची निवडणूक होत आहे. त्याला कारणेही अनेक आहेत. राज्यांमध्ये तीन पक्षाची महाविकास आघाडी असल्याने दक्षिणची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला गेली आहे. त्या ठिकाणी पक्षाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांना आमदारकीची उमेदवारी मिळाली आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दक्षिण सोलापूर तालुक्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. दिलीप माने यांचे कार्यकर्ते चिडले, त्यांनी ठिय्या आंदोलन केले, त्यानंतर दक्षिणची जागा ही काँग्रेसला सुटली असे जाहीर झाले. त्यामध्ये दिलीप माने यांचे नाव आले परंतु उमेदवारी अर्ज भरणे दिवशी माने यांना पक्षाने एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे बराच गोंधळ उडाला.
अशातच धर्मराज काडादी यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. अनेक घडामोडीनंतर अखेर दिलीप माने यांनी माघार घेतली. काडादी यांनी आपली उमेदवारी ठेवली आहे. त्यांच्या प्रचारार्थ दक्षिण तालुक्यातील हसापुरे, शेळके, पाटील, म्हेत्रे, शिवदारे, जमादार ही नेते मंडळी उघड उघड प्रचारात सहभागी झाली आहेत.
यावरून महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले पण दुसरीकडे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांची टीम महाविकास आघाडीचे उमेदवार अमर पाटील यांच्या प्रचारार्थ आता दक्षिण मध्ये सक्रिय होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
काँग्रेस भवनात एका दक्षिण मधील पदाधिकाऱ्याने ही माहिती दिली. आम्ही आमचा महाविकास आघाडीचा धर्म पाळणार, अशा सूचना प्रदेशाध्यक्षांकडून आल्या आहेत. दक्षिण मधील हे चार पाच नेते म्हणजे काँग्रेस नव्हे, काँग्रेसला जागा न सुटणे हे सुद्धा पक्षाचे दुर्दैव आहे असेही त्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.