काडादी मालकांच्या गोटात हसापूरेंचेच डिमांड ; धर्मराजांनी धर्मगुरूंना बोलावले या कार्यासाठी !
सोलापूर : दक्षिणच्या राजकारणात अचानक एन्ट्री करून धर्मराज काडादी यांनी दिग्गजांची अडचण केली. त्यांच्यामुळे माजी आमदार दिलीप माने सारख्या दिग्गज नेत्याला माघार घ्यावी लागली. त्यांच्यामुळेच महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उमेदवार अमर पाटील यांचीही अडचण झाली आहे. शेवटी धर्मराज काडादी यांनी अखेर अपक्ष म्हणून मैदानात उडी घेतली आहे.
अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना निवडणुकीत संगणक हे चिन्ह मिळाले आहे. त्यांनी आपल्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ बुधवारी जुळे सोलापुरातील गोविंद श्री मंगल कार्यालय या ठिकाणी केला. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाला लिंगायत समाजातील धर्मगुरूंनी उपस्थिती लावली.
याचवेळी व्यासपीठावर राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके, भीमाशंकर जमादार, संजय गायकवाड, तालुकाध्यक्ष हरीश पाटील यांची उपस्थिती होती. पण काडादी यांच्या गोटात काँग्रेस नेते सुरेश हसापुरे यांची मात्र प्रचंड डिमांड पाहायला मिळत आहे.
दक्षिण मध्ये सुरेश हसापुरे हे सुद्धा इच्छुक होते परंतु एकूणच राजकीय समीकरणे पाहता त्यांनी तूर्त थांबणे पसंत केले शेवटी तालुक्यातील जनतेचा रेटा पाहता त्यांनी काडादी यांना पाठिंबा दिला आहे.
खासदार प्रणिती शिंदे यांच्या विजयाच्या वाटचालीत सुरेश हसापुरे यांचा मोठा वाटा होता. खासदार ताई आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या अतिशय जवळचे म्हणून हसापुरे यांची ओळख निर्माण झाली आहे. दिलीप माने यांच्या बरोबरच हसापुरे यांची दक्षिण मध्ये गावोगावी चांगली बांधणी आहे. सोसायट्या, ग्रामपंचायत मध्ये त्यांचे वर्चस्व पाहायला मिळते.