मोठी ब्रेकींग ! सोलापूर शरद पवार गटाचे राष्ट्रवादी अध्यक्ष सुधीर खरटमल यांचा राजीनामा
सोलापूरच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर आली आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाला धक्का देणारी ही बातमी असून सोलापूरचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठवला आहे.
तसेच त्यांनी त्यांचे मित्र माजी महापौर महेश कोठे यांनाही हा राजीनामा दिला असून कोठे यांनी हा माझा राजीनामा पक्षापर्यंत पोहोच करावा असे त्यांनी म्हटले आहे.
राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर पहिल्यांदाच शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदी सुधीर खरटमल यांची निवड करण्यात आली. यामागे महेश कोठे यांचा मोठा वाटा होता. मधल्या काळात या दोन्ही नेत्यांनी एकत्रित काम केले नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महेश कोठे आणि सुधीर खरटमल यांनी काँग्रेसच्या विजयात वाटा उचलला परंतु नंतर माशी कुठे शिंकली माहित नाही सुधीर खरटमल आणि महेश कोठे यांच्यामध्ये गटबाजी पाहायला मिळाली.
दरम्यानच्या काळात महेश कोठे हे उत्तर मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आपले तयारी करत होते पण खरटमल यांच्याकडून सहकार्य मिळत नसल्याने कोठे यांच्या कार्यकर्त्यांनी नाराज होऊन महेश कोठे यांना राष्ट्रवादी सोडून शहर मध्य मधून शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली.
यावरून कोठे खरटमल यांच्यामध्ये नाराजी असल्याचे समोर आले होते. खरटमल यांनी अद्यापही शहर कार्यकारिणी जाहीर केली नसल्याने कोठे समर्थकांनी नाराजी व्यक्त केली पण कार्यकारीणी करण्यामध्ये कोठे गट आडकाठी घालत होता अशी ही माहिती समोर आली आहे.
एकूणच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या दोन नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याने त्याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता असून आता सुधीर खरटमल यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाला हा धक्का मानला जात आहे.
यापूर्वी सुधीर खरटमल हे काँग्रेस पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष होते. त्यांनी 2017 मध्ये प्रणिती शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन आपला तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यावेळी ही खरटमल चांगले चर्चेत आले होते. आताही राजीनामा दिल्याने खरटमल यांची निश्चितच सोलापुरात राजकीय वर्तुळात चर्चा होणार हे नक्की असून त्यांचा राजीनामा पक्ष स्वीकारणार का नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.