माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची संवेदनशीलता ! असे काय केले की त्या वृध्दाने हात जोडून आभार मानले
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात कायम वर्दळ पाहायला मिळते. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात असतील तर गर्दी अधिकच दिसून येते. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक यांचे अनेक विषय असतात. अनेक तक्रारी सुनावण्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे कर्मचारी आणि शिक्षकांच्या गराड्यात पाहायला मिळतात.
मागील पाच महिन्यांपासून जगताप यांनी कार्यालयात बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. परंतु मुंबई उच्च न्यायालयात कायम सुनावणी असल्याने आणि त्या ठिकाणी शिक्षणाधिकारी जाणे गरजेचे असल्याने आठवड्यातून किमान दोन दिवस त्यांना मुंबईला जावे लागते. असे असतानाही जगताप यांच्या कामावर शिक्षक संघटना समाधानी असल्याचे दिसून येते.
शिक्षणाधिकारी जगताप यांच्यातील माणुसकीचे दर्शन गुरुवारी दुपारी पाहायला मिळाले. एका शिक्षण संस्थेच्या मुख्याध्यापक पदाचा वाद होता. त्या वादाबाबत संबंधित संस्थाचालक हे जगताप यांना भेटण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये आले होते परंतु त्यांना मणक्याचा आजार झाल्याने दोन मजले वर चढून जाणे शक्य नव्हते. हे समजताच स्वतः जगताप हे आपले कार्यालय सोडून खाली त्या संस्थाचालकाची भेट घेतली त्यांचे सविस्तर म्हणणे ऐकून घेतले आणि निश्चितच या प्रकरणात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. स्वतः शिक्षणाधिकारी खाली येऊन आपले म्हणणे ऐकल्यानंतर संबंधित संस्थाचालकांनी हात जोडून त्यांचे आभार व्यक्त केले.