देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापूर दौऱ्याने भारतीय जनता पार्टीत उत्साह संचारला !
सोलापूर : भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रातील मुलुख मैदानी तोफ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापूर दौऱ्याने या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचे पाहायला मिळाले.
देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना सोलापूर लोकसभेची भाजपने उमेदवारी जाहीर केली, त्याचबरोबर माढा लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाही भाजपने उमेदवारी दिली. माढयामध्ये मोहिते पाटील यांचे बंड भाजपला अडचणीचे आणणारे आहेत. त्याचबरोबर सोलापुरात काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप समोर तगडे आव्हान उभे केले आहे. काँग्रेसने राम सातपुते यांना उपरा म्हणून संबोधल्याने त्याचीही जोरदार चर्चा झाली. एकूणच मागील दहा वर्षात भाजपच्या दोन्ही खासदारांनी सोलापूरकरांचा केलेला अपेक्षाभंग आणि नव्याने आलेले उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा दौरा हा अतिशय महत्त्वाचा मानला जात होता.
राम सातपुते आणि रणजितसिंह निंबाळकर यांनी मंगळवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. छत्रपती संभाजी महाराज चौकापासून भारतीय जनता पार्टीच्या हजारो कार्यकर्त्यांची रॅली चार हुतात्मा चौकात आली. त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे रॅलीमध्ये सहभागी झाले आणि या रॅलीचे भव्य अशा सभेमध्ये रूपांतर झाले. फडणवीस यांच्या भाषणाने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये स्फुल्लिंग चेतले.
फडणवीस यांनीही ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध काँग्रेसच्या राहुल गांधी यांचीच आहे असे सांगून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडे दुर्लक्ष करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते माजी आमदार आडमस्तर यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने त्यांनाही देवेंद्र यांनी निशाणा केला असंघटित कामगारांसाठी तयार होत असणारी तीस हजार घरेही केवळ भाजपमुळे झाली आहेत असे सांगितले. नेते कुठेही गेले तरी जनता भाजपलाच मतदान करेल असे सांगून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना मत म्हणजे राहुल गांधीला मत जाईल त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदान करून सोलापूरचा विकास साधा असे आवाहन केले आहे.