सोलापूर : शरद वन संस्थेच्या माध्यमातून सोलापूर शहरासह जिल्हाभरात वृक्ष लागवड आणि वृक्ष संगोपनाला अधिक महत्त्व दिले जाते, यावर्षीचा पावसाळा लक्षात घेऊन हरित जिल्हा निर्मितीसाठी मोठ्याप्रमाणात वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांच्या वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील निवासस्थानापासून ते त्यांच्या शेतापर्यंत सुमारे पाच हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे, अशी माहिती शरद वन संस्थेचे संस्थापक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद यांनी दिली.
शरद वन संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात, अलीकडील काळात वाढते ग्लोबल वॉर्मिंग लक्षात घेऊन पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी मोठ्याप्रमाणात वृक्ष लागवड करण्याबरोबरच त्याचे संवर्धन करणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे.
आजवर शरद वन संस्थेच्या माध्यमातून लाखो रोपट्यांची लागवड आणि संवर्धन करण्यात आले आहे. सोलापूर शहरासह ग्रामीण भागातही मोठ्याप्रमाणात वृक्ष लागवडीचा उपक्रम सुरू आहे, त्याचबरोबर सर्वसामान्य मुलांचा शैक्षणिक खर्च, अनाथांना मदत, गोरगरिबांवरील उपचार यासारखे असंख्य उपक्रम राबविण्यात येत आहेत. एक सामाजिक बांधिलकी म्हणून किंवा आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो याच भावनेतून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद यांनी आजवर विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक कार्याला प्राधान्य दिले आहे. त्यांच्या या समाजकार्याची दखल सर्वच स्तरातून घेतली जात आहे.
आता पावसाळा सुरू झाला आहे, त्यामुळे याच कालावधीत वृक्ष लागवड करणे गरजेचे असल्याचे सांगत उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील बळीरामकाका साठे यांच्या निवासस्थानापासून ते त्यांच्या शेतापर्यंत तब्बल विविध प्रजातींसह दुर्मिळ वनस्पतींची तब्बल ५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे, त्यासाठीची तयारी युद्ध पातळीवर सुरू आहे.
—
उत्तर तालुक्यातील प्रत्येक गावात उपक्रम
उत्तर सोलापूर तालुक्यातील प्रत्येक गावात सुमारे चार ते पाच हजार वृक्षांची लागवड करून त्याचे संवर्धन करण्याची मोहीम हाती घेण्यात येत आहे. त्याबाबतचे नियोजन शरद वन संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. हरित जिल्ह्यासाठीही पुढाकार घेण्याचा निर्णय शरद वन संस्थेने घेतल्याचे संस्थेचे संस्थापक प्रल्हाद काशीद यांनी सांगितले.