सोलापूर जिल्हा परिषद कृषी विभागाच्या जिल्हा निवड समितीच्या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत 45 व आदिवासी समाजातील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा या योजनेअंतर्गत 2 असे 47 विहिरींना मंजुरी देण्यात आली.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन इशादीन शेळकंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, सचिव म्हणून जिल्हा कृषी अधिकारी विशेष घटक योजना नंदकुमार पाचकुडवे ,सहाय्यक प्रशासनाधिकारी विवेक लिंगराज , समिती कार्यासन राजश्री कांग्रे व तालुक्यातील सर्व कृषी अधिकारी, विस्ताराधिकारी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे ऑनलाईनमध्ये आलेल्या अर्जामध्ये ज्या अर्जांत त्रुटी आहेत त्या त्रुटींची तात्काळ पूर्तता करून एक ऑगस्ट अखेर सर्व मुद्द्यांची पूर्तता करून पुन्हा बैठक घेण्याचे ठरले. 15 ऑगस्ट पूर्वी उर्वरित विहिरींना मंजुरी देण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याचे तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती यांना सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर पूर्ण झालेल्या विहिरींना पूरक साहित्य व वीजपुरवठा तात्काळ देण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.
दरम्यान कृषी समितीची बैठक ही संपन्न झाली. या बैठकीत कृषी विभागा अंतर्गत जिल्हा परिषद सेस मधील विविध योजनांचे आढावा घेऊन 20 ऑगस्ट पर्यंत तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांपर्यंत जिल्हा परिषद कृषी अंतर्गत विविध योजनांचे समावेश पुस्तिका व क्यूआर कोड व त्याच पद्धतीने तालुका प्रसारमाध्यमद्वारे, ग्रामपंचायत मध्ये दवंडी देऊन कृषी विभागातील योजनांची प्रचार व प्रसार करून अर्ज 20 ऑगस्ट पर्यंत मागविण्यात यावे. पुढील बैठकीत मंजुरीची प्रक्रिया करून सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात या विविध लाभाची लॉटरी काढण्याचे नियोजन करण्यात आल्याचेही श्री संदीप कोहिनकर यांनी सांगितले.