सोलापूर : प्रेषित महम्मद पैगंबर यांच्या बद्दल अनुद्गार काढणाऱ्या भाजप प्रवक्ते नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांच्या अटकेसाठी एमआयएम शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांनी केलेल्या आवाहनाला सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून मुस्लिम समाजाने प्रचंड असा प्रतिसाद दिला.
शुक्रवार असल्याने दुपारच्या नमाज नंतर या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा पासपोर्ट कार्यालयाच्या समोरून निघून सिद्धेश्वर प्रशाले मार्गे जिल्हा परिषदेच्या उपोषण गेटला येणार होता. मुस्लिम समाजातील युवकांची हजारोंची गर्दी पाहता पोलीस प्रशासनाने या मार्गावरील सर्व दुकाने बंद केले आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या मार्गावर मोठा बंदोबस्त लावला.
या मोर्चात फारूक शाब्दी, तोफिक शेख, रियाज हुंडेकरी, रेश्मा मुल्ला, गाझी जहागीरदार या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत विराट असा मोर्चा निघाला. त्यानंतर शहर काझी मुफ्ती अमजद अली काझी,मौलाना ताहेर बेग, जमियत ए उलमाचे पदाधिकारी हे सुद्धा सहभागी झाले.
मोर्चात महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश होता. भाजप प्रवक्ते नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या बाबतीत इतका रोष होता की प्रत्येकाने आपली चप्पल काढून या दोन्ही प्रवृत्तीच्या पोस्टवर जोडे मारले.
त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात फारूक शाब्दी, तौफिक शेख, रियाज हुंडेकरी, रेश्मा मुल्ला यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
फारूक शाब्दी म्हणाले, आम्ही केलेल्या आवाहनास सर्व पक्षातील मुस्लीम नेत्यांनी सहभाग नोंदवला या मोर्चातून भारतीय जनता पार्टीला इशारा देण्यात येतोय की त्यांनी स्वतःहून नवीन जिंदाल आणि नुपुर शर्मा वर गुन्हे दाखल करावेत अन्यथा मुस्लिम समाज पुन्हा पेटून उठेल असे सांगतानाच मोर्चात सहभागी झालेल्या सर्व पक्षीय नेते व सर्व मुस्लिम समाजाचे शाब्दी यांनी आभार मानले.
तौफिक शेख म्हणाले, आमचे प्रिय दैवत मोहम्मद पैगंबर यांच्यावर अपशब्द वापरणाऱ्या आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, आज काढलेल्या मोर्चात मुस्लिम समाजाने हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवून भाजपला ताकद दाखवून दिली आहे त्यामुळे लवकरात लवकर या दोघांवर गुन्हे दाखल करावेत.
रियाज हुंडेकरी म्हणाले, हे काही राजकिय व्यासपीठ नाही तर हे समाजाचे व्यासपीठ आहे, त्यामुळे आम्ही फारूक शाब्दी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला. त्यामुळे त्वरित नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी आमची मागणी असून भारतीय जनता पार्टीच्या धोरणांवर आम्हाला संशय येतो. मुस्लिम समाजाच्या अस्मितेचा विषय असताना भाजप हे जाणीवपूर्वक करत असल्याचा आरोप हुंडेकरी यांनी केला.