लोणावळ्यातील मेळाव्यात बोलताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलेला चालतो, मग मी बोललेलं का खुपतं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तसेच त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. पुण्याचे पालकमंत्री आपलं काम करत नाहीत. त्यामुळे पुढील पुण्यातील पालकमंत्री आपलाच होईल अशी शपथ घ्या, असं ते म्हणाले.
दरम्यान बारामती येथील गोविंदबाग या निवासस्थानी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पटोले बाबत विचारले असता त्यांनी थेट ती लहान माणसे आहेत त्यावर मी काय बोलू,असं म्हणत शरद पवार यांनी पटोले यांना टोला लगावला आहे.
जर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या काही बोलल्या असत्या तर मी बोललो असतो, ती लहान माणसं आहेत त्यांच्यावर मी कशाला बोलू? या गोष्टीत मी पडत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.



















