सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा डावलून भारतीय जनता पार्टी समविचारी आघाडीच्या उमेदवाराला मतदान करून पक्षाच्या पराभवास कारणीभूत झालेल्या माळशिरस तालुक्यातील शितलदेवी मोहिते पाटील, स्वरुपराणी मोहिते पाटील, अरुण तोडकर, गणेश पाटील, सुनंदा फुले, मंगल वाघमोडे या सहा सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर सुनावणी सुरू आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे सदस्य बळीराम साठे यांनी या सहा जणांच्या विरोधात तक्रार केली आहे हे प्रकरण जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन आले आहे शेवटी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात जिल्हाधिकार्यांनी सुनावणी घेऊन निकाल द्यावा अशा सूचना केल्या आहेत. सहा जुलै रोजी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासमोर सुनावणी झाली होती त्यावेळी मोहिते पाटील गटाच्या सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना मागणीचा अर्ज दिला त्याचबरोबर पहिल्या अर्जात हायकोर्टाच्या आदेशानुसार प्राथमिक मुद्दा काढावा, याचिका दाखल करताना जे कागदपत्रे सादर केले नाहीत,पुरावे नाहीत त्यावर पूर्ण चौकशी न करता प्राथमिक मुद्द्यावरच पिटीशन डिसमिस करावा अशा मागणीचा दुसरा अर्ज मोहिते पाटील गटाने दिला आहे,
तक्रारदार यांचे वकील ऍड उमेश मराठे यांनी दिलेल्या अर्जात या प्रकरणात तोंडी पुरावा जो आहे तो अगोदर सहा सदस्यांचा देण्यात यावा नंतर तक्रारदार यांना संधी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती, यावर जिल्हाधिकारी शंभरकर हे दोन्ही बाजू ऐकून घेणार आहेत. सहा जुलै नंतर 14 जुलै ही पुढील तारीख देण्यात आली होती त्यानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी थेट तीन ऑगस्ट ही तारीख दिली आहे.
तारीख पे तारीख मात्र निकालच होईना असं काहीस चित्र या प्रकरणाच झाल आहे आगामी विधानपरिषदेच्या तोंडावर ही सुनावणी महत्त्वपूर्ण मानली जात आहे या सहा सदस्यांवर जर सदस्यत्व अपात्रतेची कारवाई झाली तर भारतीय जनता पार्टीला त्या निवडणुकीत डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



















