शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात स्थायी समिती बैठक सुरू होती या बैठकीवेळी मुख्य वित्त व लेखा अधिकारी अजयसिंह पवार यांनी कोरोना काळात ग्रामीण भागातील रूग्णांचे लाखो रुपयांचे बिल ऑडिटमुळे कमी केल्यामुळे त्यांचा सत्कार अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी केला.
याच वेळी एकमेकांच्या शेजारी बसलेले माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य त्रिभुवन धाईंजे व अक्कलकोट तालुक्यातील भाजपचे सदस्य आनंद तानवडे यांच्यात चर्चा सुरू होती, दरम्यान प्रसारमाध्यम प्रतिनिधीच्या समोर धाइंजे यांनी थेट आनंद तानवडे यांना आनंद मालक, आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या…, तुमच्या तालुक्यात काम करायला मोठा स्कोप आहे काय करता भाजप मध्ये? बघितलं ना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या परिवाराची काय व्यवस्था केली भारतीय जनता पार्टीने असा थेट आरोप धाइंजे यांनी भाजपवर केला.
हे ऐकल्यावर आनंद त्यामुळे काही वेळ गप्प बसले मात्र त्यानी हात जोडले आणि माझा जन्मच भारतीय जनता पार्टी मध्ये झाला, वाढलो याच पक्षात, आमच्या कुटुंबीयांनी संपूर्ण जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी पक्ष वाढवला, हे या आयुष्यात तरी शक्य नाही असे तानवडे सांगून गेले.
काही दिवसांपूर्वीच आनंद तानवडे यांनी भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर एककल्ली कारभाराचा आरोप करत तालुक्यातील भाजप हे कल्याणशेट्टी जनता पार्टी म्हणजेच केजेपी झाल्याची टीका केली होती यावरून अक्कलकोट तालुक्यात तानवडे -कल्याणशेट्टी या दोन गटात धुसफूस कायम आहे. अक्कलकोट तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस सध्या एक चांगलं नेतृत्व शोधत आहे. या गटबाजीचा फायदा घेण्यासाठी नाराज तानवडे यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच जाळे फेकल्याची चर्चा ऐकण्यास मिळते.




















