सोलापूर : राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला. या पराभवानंतर दुखावलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अनेक अपक्ष आमदारांवर नाव घेऊन थेट आरोप केले आहेत. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांचा समावेश आहे. संजय राऊत यांनी या निवडणुकीत घोडेबाजार झाला हरभरे टाकल्यावर घोडे कुठे जातात असे म्हणून संजयमामांवर आरोप केला आहे.
दरम्यान याप्रकरणी माध्यमांनी आमदार संजयमामा शिंदे यांची प्रतिक्रिया घेतली असता, आमचा महाविकास आघाडीला पाठिंबा होता, तुमचे नेते आमच्या सोबत ठेवले होते, सूचनेप्रमाणे आम्ही मतदान केले. पराभवानंतर आरोप करणे चुकीचे आहे. आम्ही घोडेबाजार मधले आहोत का? मी हरभरे खाणार नाही स्वाभिमानी नेता आहे, हे राज्यातील सर्व नेत्यांना माहित आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन होताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आम्ही बिनविरोध पाठिंबा दिला आहे. मी विकला जाणारा नेता नाही. मला किती वेळा शिवसेनेची ऑफर होती. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपण तक्रार करणार असल्याचे संजय शिंदे यांनी सांगितले.