सोलापूर : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पदभार घेऊन साधारण दहा दिवस झाले आहेत. तीस हजार घरकुले असलेल्या रे नगर प्रकल्प आणि सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस या दोन महत्त्वकांक्षी प्रकल्पावर सुरुवातीला त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्याचबरोबर ते जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी सात पर्यंत नागरिकांच्या सेवेसाठी हजर असतात.
बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जुन्या कलेक्टर ऑफिस परिसराकडे वळाली. वाहन चालक आणि सोबत असलेले बॉडीगार्ड यांनाही काय कळाले नाही. त्यांनी या परिसरातील प्रांताधिकारी क्रमांक एक, प्रांत अधिकारी क्रमांक दोन, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, त्याचबरोबर भूसंपादन अधिकारी कार्यालय, संजय गांधी निराधार योजना कार्यालय, कर्मणूक कर कार्यालय, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, खालच्या बाजूला असलेली प्रशासकीय इमारतीमधील सर्व कार्यालय या परिसरात पाहणी केली.
तसेच जुने जिल्हाधिकारी कार्यालय ही पाहिले साडेदहाच्या सुमारासही बरेच कर्मचारी कार्यालयात हजर नव्हते याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजले. कार्यालय परिसराच्या अस्वच्छतेवरही त्यांनी संताप व्यक्त केला. गैरहजर असलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे नावे त्यांनी मागवली असल्याची माहिती मिळाली. अशा या लेटलतीफ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी आशीर्वाद हे नोटीस काढणार असल्याचे समजते.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या अचानक भेटीमुळे गैरहजर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.