सोलापूर : १ ऑगस्ट महसूल दिनानिमित्त सोलापूर जिल्हा प्रशासनाने १ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह आयोजित केला आहे. शासनातील सर्व अधिकारी ग्रामीण भागात जाऊन शासनाच्या योजनांची माहिती देऊन जनजागृती करण्यात येणार आहे. मंगळवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील बाळे येथील तलाठी कार्यालयात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते महसूल सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी सदाशिव पदडूने, तहसीलदार सैपन नदाफ, माजी नगरसेवक गणेश पुजारी, बिज्जु प्रधाणे, मंदाकिनी तोडकरी यांच्यासह मंडल अधिकारी, तलाठी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थी, महिला तसेच ज्येष्ठ नागरिक यांना विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले. नागरिकांनी कुमार आशीर्वाद यांच्यासोबत मनमोकळे पणाने संवाद साधला. ज्येष्ठांनी प्रशासनाकडून चांगल्या कामाची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी एका विद्यार्थिनीने शिक्षणासाठी वेळेवर दाखला मिळाल्याने प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
आशीर्वाद म्हणाले, जिल्ह्यातील पेंडिग कामांचा निपटारा करण्यासाठीच महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक लाभार्थ्यांना जागेवरच वेगवेगळ्या पद्धतीचे दाखले देण्यात येणार आहेत, प्रशासनाची ही सेवा केवळ सप्ताहात नाही तर कायम सुरू राहील असा विश्वास त्यांनी दिला. मी अजून प्रश्न समजून घेत आहे, नक्कीच प्रत्येकांच्या समस्येवर मार्ग निघेल त्यासाठी तुम्हा सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.