नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीवर मात करण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. सध्या देशातील जवळपास 24 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आलीये. भारतात सध्या तीन लशींच्या वापराला मंजुरी देण्यात आली आहे. यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड , भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि रशियाच्या स्पुटनिक लशीचा समावेश आहे. यातील कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड लशींचा वापर सध्या सुरु आहे.
कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्हींपैकी कोणती लस जास्त प्रभावी आहे याबाबत वैज्ञानिकांनी संशोधन केले आहे.
भारतात कोरोना लशीसंबंधात झालेल्या संशोधनात दावा करण्यात आलाय की कोविशिल्ड, कोवॅक्सिनपेक्षा जास्त अँटीबॉडी निर्माण करते. कोरोना लशीसंबंधात करण्यात आलेल्या अभ्यासात कोविशिल्ड, कोवॅक्सिनपेक्षा अधिक प्रभावी असल्याचं म्हणण्यात आलंय. हे अभ्यास भारतामध्ये करण्यात आलं आहे. यात डॉक्टर आणि नर्स यांचा समावेश होता. या लोकांना दोन्हीपैकी एका लशीचा डोस देण्यात आला होता. सांगितलं जातंय की, दोन्ही लशी प्रभावी आहेत, पण कोविशिल्डचा अँटीबॉडी रेट जास्ट आहे. असे ANI या वृत्त संस्थेने आपल्या अधिकृत ट्विटरवर प्रसिध्द केले आहे.
अभ्यासात सांगण्यात आलंय की, 552 आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी (325 पुरुष, 220 महिला) 456 जणांनी कोविशिल्डची लस घेतली होती आणि 86 जणांनी कोवॅक्सिन लस घेतली होती. सर्वांच्या शरीरात अँटिबॉडी निर्माण झाले होते. कोविशिल्ड लस घेणाऱ्यांच्या शरीरात 86.08 टक्के अँटीबॉडी आणि कोवॅक्सिन लस घेणाऱ्यांमध्ये 43.8 टक्के अँटीबॉडी तयार झाले होते. ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोवॅक्सिन आणि कोविशिल्डचा पहिला किंवा दुसरा डोस घेतला होता, अशांचा या अभ्यासात समावेश करुन घेण्यात आला होता. COVAT च्या मदतीने हा अभ्यास करण्यात आला.
कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लशींचे उत्पादन भारतात होत आहे. तर स्पुटनिक लस रशियाकडून आयात करण्यात येत आहेत. शिवाय स्पुटनिकचे भारतातही निर्माण केले जाणार आहेत. सध्या भारताला सीरम आणि भारत बायाटेकच्या लशींवर अवलंबून राहावं लागत आहे. सीरम दर महिन्याला 5 ते 6 कोटी लस निर्माण करण्याची क्षमता ठेवते, तर भारत बायोटेकने मे महिन्यात 1.3 कोटी लस निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवले होते. ऑगस्ट महिन्यापर्यंत लशीचा पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.