सोलापूर : अक्कलकोट आमदार सचिन कल्याणशेट्टी हे अनेक महिन्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये आले होते. त्यांनी नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची भेट घेतली. त्यानंतर अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या दालनात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अनेक विषयांवर चर्चा झाली.
अक्कलकोट तालुक्यातील रस्त्यांचा विषय कायमच चर्चेचा राहिला आहे. मात्र सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू असल्याचे चित्र दिसून येते. यावर बोलताना कल्याणशेट्टी म्हणाले, असा कोणता हेड नाही की मी ज्यातून रस्त्यांसाठी निधी आणला नसेल. तडवळ भागातील जर रस्त्याची अवस्था पाहिली असेल, एकदा गेलेला माणूस पुन्हा जात नसे, पण रस्ते जाऊन पहा, पहिले अडीच वर्षे आम्हाला काम करता आले नाही पण मागील एका वर्षात सर्वाधिक निधी आणला असून निधी आणण्यात बहुधा राज्यातील टॉप टेन आमदारांमध्ये माझा नंबर असेल असे आवर्जून सांगितले.
सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस मध्ये शेती गेलेल्या शेतकर्यांनी वाढीव मोबदला मिळावा म्हणून आंदोलने सुरू केलेली आहेत. त्या विषयी प्रतिक्रिया विचारली असता हा एक्सप्रेस ज्या भागातून गेला आहे तेथील जमिनीचा दर आणि हायवेच्या बाजूच्या जमिनीचा दर यामध्ये फरक आहे, शेतकऱ्यांना त्याच्या जमिनीचा चांगला मोबदला मिळावा याला आमचा विरोध नाही.
या विषयात मुंबईमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली आहे. या विषयात तोडगा काढण्यासाठी गडकरी यांनी अभ्यास टीम नेमली असून लवकरच त्यावर निर्णय होईल असे सांगताना कल्याणशेट्टी यांनी, आता जे आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत त्याच्या सत्तेवेळी शेतकऱ्यांची काय अवस्था होती त्याचे चिंतन त्यांनी करावे असे म्हणून नकळत माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यावरही टीका केली.