अक्कलकोट तालुका असेल कि विधानसभा मतदारसंघ सध्या भारतीय जनता पक्षात चांगलेच जुंपले आहे, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. जिल्हा परिषदेमधून अक्कलकोट तालुक्याला निधी देण्यावरून तर कायम वाद होत आले आहेत. त्यात पुन्हा गटबाजी. आमदार सचिनदादा हे माजी मंत्री सुभाष देशमुखांचे समर्थक आणि आनंदराव हे आमदार विजयकुमार देशमुख यांचे लाडके. या दोघांची डोकेदुखी पक्षासह जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना सुध्दा झाली आहे. एकमेकांचे पाय ओढाओढी करण्यात सध्या दोन्ही नेते गुंतलेत. त्यात पक्षनेते पद अण्णाराव बाराचारे यांना मिळाल्याने तर आनंदरावांची नाराजी आणखीच वाढत गेली.
याच पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हा परिषदेत सदस्यांच्या केबिनमध्ये आनंद तानवडे बसले होते, त्यांच्या सोबत तालुक्यातील एक ज्येष्ठ आणि मास्टर माईंड नेता बसला होता, याच वेळी पत्रकारांनी काय म्हणतंय अक्कलकोट तालुका आणि भाजप असा प्रश्न केला असता आता अक्कलकोट म्हणजे “कल्याणशेट्टी जनता पार्टी” झाली आहे, आणि त्यालाच आमचा विरोध आहे.
जिल्ह्यात भाजपची मुळे रोवली आमचे काका बाबासाहेब तानवडे यांनी, भाजप पक्षाची स्थापना झाल्यानंतर पहिले जिल्हाध्यक्ष आमचे काका होते, जेव्हा तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व लाल कृष्ण अडवाणी हे सोलापूर दौऱ्यावर येणार होते तेव्हा जिल्ह्यात गावागावात फिरून आमच्या काकांनी भाजपची पोस्टर लावली, अनगर गावात बाबासाहेब तानवडे हे गेले असताना स्वर्गीय बाबुराव पाटील अनगरकर यांनी ती पोस्टर घेतली आपल्या कार्यकर्त्यांना लावण्यास सांगून ते आमच्या काकांना जेवायला घेऊन गेले असा किस्सा आनंद तानवडे यांनी सांगितला. 2013 मध्ये सचिन कल्याणशेट्टी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, त्यांना लगेच दाढीवाल्या जिल्हाध्यक्षांनी जिल्हा सरचिटणीस केले, लगेच तालुका अध्यक्ष केले, आता त्यांनी तालुक्यात भारतीय जनता पार्टी नाही तर (केजेपी)”कल्याणशेट्टी जनता पार्टी” केली आहे.अशा शब्दांत आपला विरोध दर्शवला.
या ठिकाणी असलेल्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, आता दिल्लीपासूनच पंख छाटण्यास सुरुवात झाली आहे, त्याचे लोण महाराष्ट्रात येणार आहे?फडणवीस यांच्याशिवाय राज्यात काडी हलणार नाही, उगीच बापू शिंदे साहेबांना आपला राजकीय बाप म्हणतो काय? पायाखालची वाळू सरकली म्हणून आता अशी भाषा बोलली जात असल्याचे तो मास्टर माईंड नेता म्हणाला.



















