सोलापूर : 20 टक्के टप्पा अनुदानातील शिक्षकांना शालार्थ आयडी नसल्याने मागील आठ महिन्यांपासून वेतन मिळत नाही. या 20 टक्के टप्पा अनुदानातील शिक्षकांनी सोमवारी शिक्षण विभागासमोर एकत्र येऊन बराच वेळ आंदोलन केले.
टप्पा अनुदान तपासणी वेळी रजिस्टर गहाळ झाल्याने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत. या रजिस्टर गहाळ प्रकरणाचा गुन्हा दाखल करून त्याची एफ आय आर प्रत जोडल्याशिवाय शालार्थ आयडी मिळणार नाही असे शिक्षकांचे म्हणणे आहे. यासाठी सोमवारी शिक्षकांनी एकत्रित येऊन आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी बराच वेळ ठिय्या आंदोलन केले.
याप्रकरणी अधिक माहिती देताना शिक्षक रमेश पाटील म्हणाले, वीस टक्के टप्पा अनुदान मंजूर होऊन आता नऊ महिने झाले परंतु शालार्थ आयडी नसल्याने आमची पगार मिळत नाही. जोपर्यंत रजिस्टर गहाळ प्रकरणातील गुन्हा दाखल झाल्याची प्रत मिळणार नाही तोपर्यंत शालार्थ आयडी मिळणार नाही त्यासाठी आम्ही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.