“कौन बनेगा मध्य का आमदार” कुणाचे प्लस आणि कुणाचे मायनस पॉईंट
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघापैकी सोलापूर शहर मध्य हा मतदारसंघ अतिशय संवेदनशील मानला जातो. या ठिकाणी मागील दोन निवडणुका या हिंदुत्ववादावर झाल्याचे पाहायला मिळाल्या. परंतु शिवसेना-भाजपचा उमेदवार असतानाही अनेक हिंदुत्ववादी मते प्रणिती शिंदे यांना मिळाल्याने त्या विजयी झाल्या.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र चित्र बदलले आहे. या मतदारसंघाच्या तीन टर्म प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रणिती शिंदे खासदार झाल्याने आता या मतदारसंघात आमदार कोण? अशी एकच चर्चा सर्वत्र ऐकण्यास मिळते. अशी तगडी फाईट सुद्धा या मतदारसंघात होत आहे.
आमदारकीचा प्रचंड अनुभव असलेले आडम मास्तर हे पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला होता. महाविकास आघाडीतून आडम यांना तिकीट मिळेल अशी अपेक्षा कार्यकर्ते ठेवून होते परंतु त्यांचा अपेक्षाभंग झाला. शेवटी मास्तरांनी आपली लढवय्या भूमिका कायम ठेवत विरोधकांना तगडे आव्हान दिले आहे.
तीस हजार घरकुलांचे लाभार्थी हे आडम मास्तरांचे प्लस पॉइंट आहेत. त्यांच्या जोरावरच आडम हे निवडणूक लढवत आहेत परंतु मागील दोन निवडणुकांचा अनुभव पाहता एमआयएम आल्याने मुस्लिम मते बाजूला गेली, प्रणिती शिंदे असल्याने मोची मते मिळाली नाहीत, यंदा हे दोन समाज काय निर्णय घेतात यावर मास्तरांचे भवितव्य आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत नवख्या असतानाही एम आय एम पक्षाकडून निवडणूक लढवलेले फारूक शाब्दि हे तब्बल 38 हजार 700 एवढी मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यामुळे पुढील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी पाच वर्ष मोर्चे बांधणी केली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस विरोधात एमआयएमचा उमेदवार न दिल्याने मुस्लिम समाजातून त्यांचे स्वागत झाले. त्यातच मध्य मध्ये प्रणिती शिंदे नसल्याने त्यांनाही मोठी संधी आहे. काँग्रेस पक्षाने मुस्लिम उमेदवार न दिल्याने फारूक शाब्दि यांना फायदा होईल असे चित्र आहे. परंतु तौफिक शेख हे उमेदवार असल्याने येणाऱ्या बारा दिवसात काय घडामोडी घडतात हेही पाहणे महत्त्वाचे आहे. फारूक शाब्दी यांना विजयाला लागणारे आणखी किमान दहा ते बारा हजार मध्ये इतर समाजाची आवश्यक आहेत, आंबेडकरी समाज आणि मुस्लिम समाजाने लोकसभेप्रमाणे उत्साहाने मतदान केले तर निश्चित एमआयएमचा आमदार फारुक शाब्दि यांच्या रूपात पाहायला मिळेल.
पंधरा वर्ष मतदारसंघ सांभाळणाऱ्या प्रणिती शिंदे यांचा वारसदार कोण? असा प्रश्न मागील सहा महिन्यात उपस्थित झाला. मोची समाज व मुस्लिम समाजाने या उमेदवारीसाठी जोर लावला होता पण शेवटी शहराध्यक्ष आणि पक्षासोबत एकनिष्ठ राहिलेले चेतन नरोटे यांना उमेदवारी मिळाली. गिरणी कामगारांचा मुलगा, 22 व्या वर्षात नगरसेवक, स्थायी समिती सभापती, गटनेता, काँग्रेस शहराध्यक्ष अशी पदे भूषवलेल्या नरोटे यांना आमदारकीची चांगली संधी आहे. या मतदारसंघातील मुस्लिम समाज, मोची समाज, आंबेडकरी समाज, रामवाडी सेटलमेंट भागातील काँग्रेसला पडणारी मते पुन्हा नरोटे यांना मिळाली तर निश्चित नरोटे यांना संधी आहे. नाराज मुस्लिम आणि मोची समाजाने आपली नाराजी मतपेटीतून दाखवली तर याचा फटका काँग्रेसला बसू शकतो.
घरात राजकीय वारसा असलेले, युवा देवेंद्र कोठे यांना भारतीय जनता पार्टीने शहर मध्य मधून उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवत देवेंद्र कोठे यांनी भारतीय जनता पार्टी प्रवेश केला. त्यावेळी फडणवीस यांनी त्यांचे पालकत्व स्वीकारले आणि लोकसभा निवडणुकीत कामाला लागण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार शहर मध्य या मतदारसंघावर कोठे यांनी फोकस करत आमदार राम सातपुते यांच्यासाठी मतदार संघ पिंजून काढला. त्याचा फायदा म्हणजे प्रणिती शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात त्यांना मोठ्या मताधिक्यापासून रोखण्यात यश मिळाले.
यानंतर मागील सहा महिन्यांमध्ये महासेवा शिबिराच्या माध्यमातून देवेंद्र कोठे यांनी आपली मोर्चे बांधणी करत नागरिकांना शासकीय सेवा पुरवल्या. आता विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना पद्मशाली समाज, लोधी समाज, ब्राह्मण समाज, वडार समाज, बेडर समाज हे सर्व हिंदुत्ववादी मध्ये मानले जातात. देवेंद्र कोठे यांची ओळख सर्व समाजात असल्याने त्यांना पहिल्याच टर्ममध्ये आमदार होण्याची मोठी संधी आहे.
लोकसभा निवडणुकीत त्यांनी मुस्लिम समाजाबाबत केलेले वक्तव्य काहीसे अडचणीचे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसवर नाराज मोची समाज, भटका विमुक्त समाज ही मते जर भाजपला मिळाली तर कोठे युवा आमदार म्हणून विधानसभेत पाहायला मिळतील यात शंका नाही.