सुरेश हसापुरे है तो सब मुमकिन है !
सोलापूर : 2024 ची लोकसभा निवडणूक आणि कारणाने लक्षात राहणारी आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून यावेळी सुशीलकुमार शिंदे यांच्या ऐवजी त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे या निवडणूक लढवत आहेत. निवडणूक जाहीर होण्याच्या दोन महिने अगोदरपासूनच प्रणिती शिंदे यांनी आपला प्रचार सुरू केला होता. त्यामुळे या मतदारसंघातील सुमारे साडेचारशे गावांमध्ये त्या पोचू शकल्या आहेत. परंतु शिंदे यांच्या प्रचारात एक चेहरा मात्र सर्वांचा लक्ष वेधून घेत असतो तो म्हणजे दूध संघाचे संचालक तथा दक्षिण तालुक्याचे नेते सुरेश हसापुरे यांचा.
सुरेश हसापुरे यांच्या नावाशिवाय सोलापूरचे राजकारण पूर्ण होऊ शकत नाही. कारण त्यांच्या चाणक्यनीतीने कोणी स्वप्नात विचार केले नव्हते ती मंडळी मोठमोठे राजकीय पदे भोगली आहेत. संजय शिंदे यांना जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यात, प्रशांत परिचारक यांना विधान परिषदेचा आमदार करण्यात, विजय देशमुख यांना बाजार समितीचा सभापती करण्यात, समाधान आवताडे यांना आमदार करण्यात, सिद्धाराम म्हेत्रे यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक करण्यात, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी निवडी असतील, दूध संघाची निवडणूक असेल, सहकार विभागात तर हसापूरे यांनी जुळवल्याशिवाय काहीच होत नाही असे चित्र आहे.
काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी मागील सहा महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीचे मैदान सुरेश हसापुरे यांनीच तयार केले. प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रम, स्पर्धा राबवून त्यावेळी पासूनच त्यांना भविष्यातील खासदार म्हणून ओळख निर्माण करून दिली.
लोकसभा निवडणुकीतील शिंदे यांचे जनवात्सल्य हे निवासस्थान सध्या केंद्रबिंदू राहिले. त्या ठिकाणाहून निवडणुकीचे सूत्र हलली, तिथल्या प्रत्येक निर्णयात हसापुरे यांचा समावेश पाहायला मिळाला. सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे यांच्या अतिशय विश्वासातील कार्यकर्ता म्हणून हसापुरे यांची ओळख निर्माण झाली आहे. कधी कधी तर सुशीलकुमार शिंदे हे मजेने हा माणूस मला मिळायला एवढा उशीर का झाला असेही बोलून जातात.
सोलापूरच्या राजकारणातील चाणक्य म्हणून हसापुरे यांची ओळख आहे. या लोकसभा निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणारी आहे. या निवडणुकीने मोहिते पाटील आणि शिंदे घराण्याचे ऋणानुबंध अधिक घट्ट झाले. यामध्ये हसापूरे यांचा रोल महत्त्वाचा ठरला आहे. मोहिते पाटलांच्या तालमीत काम केल्याने हसापुरे यांना संपूर्ण जिल्ह्याची माहिती आहे. मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ यामध्ये निवडणुकीचे नियोजन लावण्यात हसापुरे यांचा मोठा वाटा आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात तर त्यांनी रान पिंजून काढले आहे. त्यामुळे यंदा दक्षिण मधून मोठे मताधिक्य प्रणिती शिंदे यांना मिळेल असे बोलले जाते.
सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी अति आत्मविश्वासाने लोकसभेची संपूर्ण जबाबदारी हसापुरे यांच्यावर सोपवली होती. ती पूर्ण विश्वासाने हसापूरे यांनी पार पाडली. अंतर्गत अनेक शत्रूंनी कटकारस्थान केले परंतु शेवटपर्यंत हसापुरे यांच्याकडेच लोकसभेचे सूत्रे राहिली. जर प्रणिती शिंदे या निवडून आल्या तर हसापुरे यांचाच धबधबा वाढणार हे पण तितकेच खरे आहे. कारण आज पर्यंत सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे या जे सांगतील ते काम त्यांनी मनापासून केले आहे. उदाहरणार्थ प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा दौरा असो की भारत जोडो यात्रा, कुठलाही आणि कोणताही कार्यक्रम असो, पडत्या काळात शिंदे परिवारासोबत चार वर्षापासून हसापुरे हे एकनिष्ठ राहून काम करत आहेत. एक वेळ होती सगळेच नेते सोडून गेले असताना सत्ता असो वा नसो हसापुरे काम करत राहिले. जर प्रणिती या खासदार झाल्या तर हसापुरे यांचे नाव कोणत्याही मतदारसंघातून उमेदवार म्हणून आले तर नवल वाटू नये.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील हे भाजपच्या गोटात गेल्याने आता जिल्हाध्यक्ष पदासाठी सुरेश हसापूरे यांच्याच नावाची चर्चा ऐकण्यास मिळते. मागील अनेक वेळा त्यांना जिल्हाध्यक्ष पदाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या नशिबात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद की विधानसभेची उमेदवारी हा येणारा काळच ठरवणार आहे.