मुसलमानांनों आता तरी शहाणे व्हा ! काँग्रेसला मत म्हणजे भाजपला मत ; एमआयएम नेते मोईन सय्यद यांचे आवाहन
सोलापूर : आजपर्यंत मुस्लिम समाज काँग्रेसच्या पाठीशी होता, मुस्लिमांच्या मतांवर काँग्रेसने राज्य केले परंतु आज काँग्रेसचेच नेते भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेत. एमआयएम हा एकच पक्ष आहे जो देशात मुस्लिमांच्या प्रश्नावर भांडतो, वाचा फोडतो, मदतीला धावून येतो. आज तुम्ही काँग्रेसला अथवा राष्ट्रवादीला मतदान केले तर ते भाजपलाच जाते त्यामुळे “मुसलमानांनों आता तरी शहाणे व्हा” असे कळकळीचे आवाहन एमआयएम पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मोईन सय्यद यांनी सोलापुरात केले.
सोलापूर एमआयएमच्या वतीने रंगभवन हॉल येथे संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. नांदेड येथील मोईन सय्यद संकल्प मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मोईन सय्यद हे मूळचे नांदेड येथील आहेत. नांदेड येथे एमआयएम पक्षाच काम करताना काँग्रेसचे तत्कालीन नेते अशोक चव्हाण यांनी सर्वात जास्त त्रास दिला.अनेक खोट्या गुन्ह्यात मला अडकवण्याचे काम केले. सद्यस्थितीत अशोक चव्हाण यांनी नांदेडच्या जनतेला धोका देत भाजप प्रवेश केला असे सांगत मोईन सय्यद यांनी अशोक चव्हाणसह काँग्रेसवर निशाणा साधला.