अक्कलकोट : अक्कलकोट – सोलापूर रोडवरील लकी हॉटेलजवळ अचानकपणे दुचाकीचा पुढचा डिस्क ब्रेक दाबल्याने दुचाकीवरील दोघे भाऊ फरफटत जाऊन जोरात पडल्याने महांतेश इरय्या मठ वय २१ रा. करजगी ता. अक्कलकोट(akkalkot) यास डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला.
ही घटना शुक्रवारी दि १७ दुपारी घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि १७ डिसेंबर रोजी शांतय्या व महांतेश इरय्या मठ दोघे भाऊ निलम नगर सोलापूर या राहण्याच्या ठिकाणाहून मूळगाव करजगी ता. अक्कलकोट येथे गॅस कनेक्शन ट्रान्स्फर करण्यासाठी दुचाकीवरून अक्कलकोटला आले होते. अक्कलकोटमधील गॅस कनेक्शनचे काम आटोपून सोलापूरला जात असताना अक्कलकोटजवळ असणाऱ्या लकी हॉटेलजवळ आले.
महांतेश मठ हा सुझुकी झिक्सर स्पोर्ट दुचाकी क्र एम एच १३ डी एफ ७१४३ चालवत होता व मोठा भाऊ पाठीमागे बसला होता. महांतेशने अचानक दुचाकीचा डिस्क ब्रेक दाबल्याने गाडीसह दोघे भाऊ रस्त्यावर जोरात आदळले. यामध्ये महांतेश मठ (वय २१) यास डोक्याला जबर मार लागून तो जागीच ठार झाला.
मोठा भाऊ शांतय्या मठ यास डोके हात पाय यांना जोरात मार लागला असून गंभीर जखमी झाला. त्यास उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यावर उपचार चालू आहेत. या घटनेची फिर्याद शांतय्या मठ यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुजावर हे करीत आहेत.

















