सोलापूर : 31 मे हा दिवस सेवानिवृत्तीचा दिवस मानला जातो. त्या दिवशी शासकीय सेवानिवृत्ती मोठ्या प्रमाणात होतात. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये तब्बल 204 अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलेल्या सूचनेनुसार यशवंतराव चव्हाण सभागृहात या 204 कर्मचाऱ्यांना आनंदी निरोप देण्यात आला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकांदे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी उत्तम सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला.
सेवानिवृत्त झालेल्या या 204 कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक शिक्षक संख्या आहे. यामध्ये प्राथमिक शिक्षक 130, बांधकाम क्रमांक एक 10, बांधकाम क्रमांक दोन 10, आरोग्य विभाग 11, कृषी 4, लघुपाटबंधारे 1, अर्थ विभाग 3, सामान्य प्रशासन विभाग 7, ग्रामपंचायत विभाग 19, पशुसंवर्धन विभाग 7, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग 2 अशी सेवानिवृत्त झालेली कर्मचारी संख्या आहे.






















