सोलापूर : मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिन 2023 या कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाच्या सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, महापालिका आयुक्त शीतल तेली, कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस, प्र कुलगुरू डॉ. राजेश गादेवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थितांना जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान जनजागृतीची शपथ दिली. तसेच यावेळी नव मतदार, तृतीयपंथीय मतदार यांना मतदान ओळखपत्राचे वाटप, शाळा व महाविद्यालयामधील विविध स्पर्धेतील उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा सत्कार व मतदार नोंदणीबाबत उत्कृष्ट कामगिरी केल्याबदल अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. भारत निवडणूक आयोगाकडील वर्षभर नियमितपणे चालणाऱ्या मतदार नोंदणी अभियानाचे व निवडणूक विषयक सर्व बातम्याद्वारे नागरिकांमध्ये मतदानासाठी जनजागृती व्हावी यासाठी विशेष प्रसिध्दी दिल्याने प्रसारमाध्यम प्रतिनिधींचा प्रतिनिधीक स्वरुपात विशेष सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, लोकशाहीमध्ये मताचे मूल्य अमूल्य आहे त्यासाठी मतदानाची जनजागृती होणे गरजेची आहे, प्रशासन मतदानाचा टक्का वाढण्यासाठी प्रयत्न करते त्याला जनतेने सहकार्य केल्यास निश्चितच लोकशाही बळकट होईल.
सीईओ स्वामी म्हणाले, मागील तेरा वर्षापासून भारतामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो, सरकारवर हा दिवस साजरा करण्याची वेळ का आली? देशामध्ये लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का दिवसेंदिवस कमी होत चालला त्यामध्ये वाढ होण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. त्यामुळे शासन विविध उपक्रमाच्या माध्यमातून मतदार जनजागृती करीत आहे लोकशाहीने दिलेला अधिकार प्रत्येकाने गांभीर्यपूर्वक वापरावा असे आवाहन केले.
आयुक्त तेली-उगले म्हणाल्या, एखाद्या सर्वात श्रीमंत माणसाच्या मताला जितके महत्व आहे तितकेच महत्व सर्वात गरीब, मजुरांच्या मताला आहे, आपण मतदान म्हणतो ते मत दान करताना पैसे घेऊ नका असे आवाहन केले
पोलीस आयुक्त माने म्हणाले, मत देणे हा अनमोल अधिकार आहे आणि तो हक्क बजावण्यासाठी वारंवार सांगावे लागते हे दुर्दैव आहे, म्हणूनच व्होट जैसा कुछ नहीं, उसका हक्क बजाये असे आवाहन त्यांनी केले.
मतदार जनजागृतीसाठी यंदाच्या ‘माझं मत माझं भविष्य’ या थिम वर रैली, चित्रकला स्पर्धा, रांगोळी, पोस्टर्स व निबंध स्पर्धेचे आयोजन जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयातील निवडणूक साक्षरता मंडळाच्या सोबत संयुक्तपणे करण्यात येणार असल्याचेही श्री. वाघमारे यांनी सांगितले.